प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूटचे ‘ड्रायोमिक्स’ ठरले सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:00 PM2018-10-03T22:00:26+5:302018-10-03T22:01:04+5:30
स्थानिक प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम व इमारत दुरुस्तीच्या कामात उपयोगी ठरणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ‘टेक-टॉप २०१८’ या राष्ट्रीय स्पर्धेत या उत्पादनाने तिसरा क्रमांक पटकावला, तर एआयसीटीईने २४ नावीन्यपूर्ण संकल्पनांमध्ये त्याची निवड केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : स्थानिक प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चच्या विद्यार्थ्यांनी बांधकाम व इमारत दुरुस्तीच्या कामात उपयोगी ठरणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ‘टेक-टॉप २०१८’ या राष्ट्रीय स्पर्धेत या उत्पादनाने तिसरा क्रमांक पटकावला, तर एआयसीटीईने २४ नावीन्यपूर्ण संकल्पनांमध्ये त्याची निवड केली आहे.
स्थापत्य अभियांत्रिकीची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी जास्मिन मोरय्या हिच्यासह पासआऊट झालेले प्रणव डालकर, अक्षय वाघ, चेतन वानखडे आणि अंकुर इंगळे यांनी बांधकाम आणि दुरुस्ती-देखभालकरिता अत्यंत उपयोगी असणारे ड्रायोमिक्स या उत्पादनाची निर्मिती केली. तामिळनाडूतील राष्ट्रीय संशोधन केंद्र कलासालिंगम येथे आयोजित ‘टेक-टॉप २०१८’मध्ये या चमुने ड्रायोमिक्ससाठी तृतीय क्रमांक आणि ३० हजारांचे पारितोषिक पटकावले. त्यामुळे राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा-२०१८ साठी त्याची निवड झाली आहे. अनेक मान्यवर संशोधक व बांधकाम क्षेत्रातील दिग्गजांनी ड्रायोमिक्सचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांकडून ड्रायोमिक्सचे भरपूर उत्पादन घेण्यासाठी आॅफर मिळाल्या तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, कार्यकारिणी पदाधिकारी हेमंत देशमुख, पंकज देशमुख, युवराजसिंह चौधरी, उदय देशमुख, नितीन हिवसे, गजानन काळे आणि रागिनी देशमुख, प्राचार्य ए.पी. बोडखे, उद्योजकता विकास विभागाचे अधिष्ठाता एन.डब्ल्यू. काळे व उद्योजकता विकास विभागाचे प्रभारी ए.यू. आवटे यांनी कौतुक केले.
पेटेंटची प्रक्रिया
प्रा. एम.व्ही. मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज केला. पेटेंटसाठी त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. हे पेटेंट मंजूर होईल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. ड्रायमिक्समध्ये ड्राय कॉंक्रीट, टाइल-ओ-फिक्स, ड्राय-ओ-मिक्स-अॅडमिक्स्चर आदी बाबींचा अंतर्भाव असून, त्यासंबंधी उत्पादनांची निर्मिती करू, असे ते म्हणाले.