राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुत्र्यांवर पायरो व्हायरस आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:01:00+5:30
अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, .....
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : अमरावती, नागपूर, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाळीव व मोकाट श्वानांवर पायरो व्हायरस आजाराचे संकट आले आहे. अमरावती शहरात दररोज शंभरावर श्वानांवर उपचार केले जात आहेत. रेबीज आणि पायरो व्हायरसचे लसीकरण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, असे मत पशुधन विकास अधिकारी डी.एन. हटकर यांनी लोकमतला सांगितले.
अमरावती शहरातील जिल्हा पशू सर्वचिकित्सालयात पायरो व्हायरसची लागण झालेले श्वान व शेळीवर उपचार केले जात आहेत. आठ ते दहा दिवस सलाईनने उपचार केला जात आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक कुत्री गत चार ते पाच आठवड्यांपासून उपचाराकरिता आणली जात आहेत.
रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन जरुरी
गावठी आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याची लागण होऊ नये, यासाठी रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन लावणे गरजेचे आहे. तथापि, ७५० रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्याने पशुपालकदेखील त्यांच्याकडील कुत्री, बकऱ्या या जनावरांना ही लस टोचून घेत नाहीत, याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
मुंबई, नागपूर, अमरावतीत लागण
चार ते पाच आठवड्यांपासून मुंबई, नागपूर, अमरावती व राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पायरो व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात कुत्र्यांमध्ये झाली आहे. इतरही जिल्ह्यात संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हा संसर्ग या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.
शहरात दररोज शंभरावर पायरो व्हायरस झालेल्या श्वानांवर उपचार सुरू आहेत. नागपूर-मुंबई व इतरही जिल्ह्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रेबीज आणि पायरो व्हायरससंबंधी लसीकरण करणे गरजेचे आहे. तथापि, एकाही जनावराचा या व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झालेला नाही.
- डी.एन. हटकर, पशुधन विकास अधिकारी, अमरावती