मासोळीच्या शिकारीसाठी नदीत उतरलेला अजगर अडकला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:56 PM2019-04-12T20:56:06+5:302019-04-12T20:56:18+5:30
मासोळीला भक्ष्य करण्यासाठी बेंबळा नदीत उतरलेला अजगर जाळ्यात अडकला. वनविभाग व वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला तीन दिवसानंतर जाळ्यातून मुक्तता केली.
अमरावती - मासोळीला भक्ष्य करण्यासाठी बेंबळा नदीत उतरलेला अजगर जाळ्यात अडकला. वनविभाग व वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी अजगराला तीन दिवसानंतर जाळ्यातून मुक्तता केली. वसाच्या रेस्क्यू सेंटरला त्याची तब्बल १७ दिवस शुश्रुषा केल्यानंतर जंगलात सोडण्यात आले.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा (गुरव) गावाजवळून वाहणाºया बेंबळा नदीत मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अजगर असल्याची माहिती वनविभागाच्या बडनेरा येथील कार्यालयास २५ मार्च रोजी तेथील रहिवासी नानकसिंग यांनी फोनद्वारे कळविली. त्यावरून सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल भटकर यांनी वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाइनला माहिती देत वनरक्षक के.आर. धोत्रे आणि रेस्क्यूअर भूषण सायंके यांना पाचारण केले. तो तीन दिवसांपासून जाळ्यात अडकला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने भूषण सायंकेच्या मदतीने अजगराला जाळ्यातून सोडविले आणि नदीच्या बाहेर काढले. जखमी असल्याने त्या अजगरावर शासकीय पशवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर अजगराची वसा संस्थेच्या रेस्क्यू सेंटरमध्ये १७ दिवस योग्य काळजी घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
जाळे कापले
सदर अजगर नदीच्या मधोमध जाळ्यात अडकला होता. रेस्क्यूअर भूषण सायंके सर्व तयारीनिशी नदीत उतरले आणि मोठ्या शिताफीने नऊ फुटी अजगराला जाळ्यासहित पाण्याबाहेर काढले. यानंतर जाळे कापून अजगराची सुटका करण्यात आली. दोन ते तीन दिवसांपासून जाळ्यात अडकला असल्यामुळे अजगर जखमी झाल्याचे लक्षात आले.
रुग्णालयात उपचार
वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या परवानगीने सदर जखमी अजगरावर अमरावती येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात डॉ. विजय हटकर आणि डॉ. अनिल कळमकर यांनी उपचार केला. १७ दिवस राहिल्यानंतर पुन्हा या अजगराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पंचनाम्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
उन्हाळ्यात साप व इतर सरपटणारे प्राणी थंडावा व ओलाव्याच्या शोधात मानव वस्तीत आढळून येतात. अशा वेळी सापाला हानी न पोहोचवता ताबडतोब वनविभागाला किंवा वसा संस्थेला माहिती द्यावी.
- भूषण सायंके, अॅनिमल्स रेस्क्यूअर, वसा संस्था)