हॉटेलात जेवताना क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये भांडाभांडी; एकाचा गेला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2023 06:36 PM2023-01-09T18:36:41+5:302023-01-09T18:41:11+5:30
Amravati News हॉटेलमध्ये जेवण करताना चार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्याचे पर्यवसान पुढे एकाचा बळी घेण्यात झाले.
अमरावती: हॉटेलमध्ये जेवण करताना चार मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्याचे पर्यवसान पुढे एकाचा बळी घेण्यात झाले.
जुना बायपासवरील एका ढाब्यानजिक रविवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा उर्फ कान्हा ज्ञानेश्वर इसळ (१९, रा. अंबाविहार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. तीनही आरोपींना अटक करून बडनेरा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
यश संगेले (२२, अंबाविहार), ऋषभ ठाकरे २७, देशपांडे वाडी) व सर्वज्ञ वऱ्हाडे (१९, अंबाविहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. खोलापूरी गेट पोलिसांनुसार, कृष्णा उर्फ कान्हा ज्ञानेश्वर इसळ व तिघेही आरोपी रविवारी रात्री बगिया टी प्वाईंटजवळच्या एका ढाब्यावर जेवण करण्यास गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान आरोपींनी कृष्णा उर्फ कान्हाच्या गुडघ्याखाली पायावर चाकूने प्राणांतिक वार केला. तो रक्तबंबाळ स्थितीत ढाब्याच्या प्रवेशद्वारावर कोसळल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. तर, अनोळखी एकाने कान्हाच्या नातेवाईकांना फोन करून त्याचा अपघात झाला असून, त्याला इर्विनमध्ये हलविल्याचे सांगितले. त्यामुळे कान्हाचे नातेवाईक इर्विनमध्ये पोहोचले. मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
कान्हाचे घर खोलापुुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद घेतली. दुसरीकडे सोमवारी सकाळीच आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी एसीपी लक्ष्मण डुंबरे, बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार व खोलापुरी गेटचे ठाणेदार गजानन तामटे यांनी भेट दिली.
तर मृतदेह उचलणार नाही
दरम्यान, कान्हाची स्थिती पाहता तो अपघात नसून त्याचा खून करण्यात आल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी खोलापूरी गेट पोलिसांमध्ये नोंदविली. तर दुसरीकडे नातेवाईकांसह ॲम्बुलन्स चालकांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांची भेट घेऊन फरार आरोपींना अटक होईपर्यंत मूतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतला. शवागार व इर्विन रूग्णालयात चांगलाच हलकल्लोळ उडाला होता. दुपारी तिनच्या सुमारास तिनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तणाव निवळला.
ढाब्यावर जेवण करत असताना चौघांमध्ये वाद झाला. त्यात कान्हावर चाकुने वार करण्यात आला. तिनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
गजानन तामटे, ठाणेदार, खोलापुरी गेट