राजापेठ ‘आरओबी’च्या आठ कोटी रुपयांच्या उभारणीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: August 21, 2015 12:47 AM2015-08-21T00:47:02+5:302015-08-21T00:47:02+5:30
राजापेठ येथे प्रस्तावित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त ८ कोटी रुपयांच्या रक्कम उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे.
निधी, वाटाघाटीत घोळ : रेल्वे फाटक कृती समितीचा आरोप
अमरावती : राजापेठ येथे प्रस्तावित रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त ८ कोटी रुपयांच्या रक्कम उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे. शासनाची परवानगी न घेता कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्यात आल्यात ही बाब भविष्यात शहरवासीयांची फसवणूक करणारी ठरेल, असा आरोप राजापेठ रेल्वे फाटक कृती समितीने केला आहे.
राजापेठ रेल्वे फाटक कृती समितीचे अध्यक्ष मुन्ना राठोड यांनी आयुक्त गुडेवार यांना दिलेल्या निवेदनानुसार हा उड्डाणपूल निर्माण व्हावा, यासाठी मोर्चे, आंदोलन, चक्काजाम, बाजारपेठ यापूर्वी बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे, लोकप्रतिनींधीच्या पुढाकाराने उशिरा का होईना राजापेठ आरओबी निर्मितीचा मार्ग सुकर झाला. मात्र आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नागपूर येथील चाफेकर अँड कंपनीला २५.७८ टक्के जादा दराने उड्डाणपूल निर्मितीचा कंत्राट सोपविताना ८ कोटी रुपयांची रक्कम कशी, कोठून उभारणार हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला कळविले नाही. वाटाघाटी करताना पहिल्या तीन कंत्राटदारांना चर्चेसाठी बोलाविले नाही, असा राठोड यांचा आरोप आहे. मूळ निविदेच्या रक्कमेपेक्षा ८ कोटी रुपये जास्त किमतीला प्रशासनाने मंजुरी दिली. तत्कालीन आयुक्तांनी १२ कोटींपेक्षा जास्त दराने निविदा आली असता ती शासनाच्या मार्गदर्शनासाठी पाठविली होती. कारण निविदेत तफावत असलेली रक्कम कोठून उभारणार हे प्रशासनाने स्पष्ट करणे अनिवार्य आहे. ‘आरओबी’ साठी शासनाकडून प्राप्त १० कोटींचा निधी बँकेत मुदत ठेव करुन त्यावर कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे. ३२ कोटी रुपये ही रक्कम शासनाने मंजूर केली किंवा नाही, हे गुलदस्त्यात आहे. आरओबीमध्ये रेल्वे हद्दीतील बांधकामाला महापालिकेचा वाटा किती राहील, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मुन्ना राठोड म्हणाले.