‘प्रश्नचिन्ह’चे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:40 PM2018-05-02T23:40:25+5:302018-05-02T23:40:52+5:30

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीदरम्यान मंगरूळ चव्हाळा येथील फासे पारधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची २० गुंठे जागा जाणार आहे.

'Question mark' will be surveyed | ‘प्रश्नचिन्ह’चे होणार सर्वेक्षण

‘प्रश्नचिन्ह’चे होणार सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा दिलासा : फासे पारधी मुले शिक्षणापासून वंचित होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीदरम्यान मंगरूळ चव्हाळा येथील फासे पारधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची २० गुंठे जागा जाणार आहे. मात्र, ही आश्रमशाळा सुरक्षित असावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नव्याने सर्वेक्षणाचे आदेश दिले असून, महामार्ग वळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेच्या जागेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी आश्रमशाळेचे संचालक मतीन भोसले, भाजपचे जिल्हासरचिटणीस गजानन कोल्हे, सोपन गुडधे, शिवा पाटील आदींनी आश्रमशाळेची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात मांडली. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या परिसरातून समृद्धी महामार्गासाठी २० गुंठे जागा शासनाला अधिग्रहीत करावी लागणार आहे. परिणामी ही आश्रमशाळा बाधित होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मतीन भोसले यांनी समृद्धी महामार्ग वळविण्यासाठी विनंती केली. अतिशय आस्थेने आणि जिव्हाळ्याने मुख्यमंत्र्यांनी प्रश्न, समस्या समजावून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जैसे थे जागा कायम ठेवण्याला प्राधान्य देणार असून, नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. मतीन भोसले यांनी आश्रमशाळेच्या माध्यमातून पारधी मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू केले आहे. दरम्यान, मतीन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना आश्रमशाळेच्या प्रवासाबाबत डाक्युमेंट्री दाखविली. दरम्यान आश्रमशाळेची समस्या, प्रश्न सोडविल्या जातील, असा विश्र्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
आश्रमशाळेचे वाचनालय होणार बाधित
प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या परिसरातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने सध्या आश्रमशाळा बाधित होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले वाचनालय बाधित होऊ नये, यासाठी जोरकस प्रयत्न सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. आश्रम शाळेच्या जागेसंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
- मतीन भोसले,
संचालक, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा

Web Title: 'Question mark' will be surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.