महाराष्ट्र संघ निवडीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: September 29, 2016 12:17 AM2016-09-29T00:17:09+5:302016-09-29T00:17:09+5:30
राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.
पुण्यातील खेळाडूला डावलले : पालकांचा स्पष्ट आरोप
अमरावती : राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र, निवड समितीने पुणे संघातील एका खेळाडुूला मुद्दामच डावलल्याचा आरोप खेळाडूच्या पालकांनी केल्याने गोंधळ उडाला होता.
पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना व जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाचदिवसीय बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राज्यभरातील ८०० खेळाडूंनी भाग घेतला. मंगळवारी स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.याकार्यक्रमात विजेता, उपविजेत्यांसह तृतीय क्रमाक पटकावणाऱ्या संघांना ट्रॉफी व बक्षिस वितरीत करण्यात आले. बुधवारी विविध वयोगटनिहाय खेळाडूंची चाचणी घेऊन महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार होता. निवड समितीने खेळाडूंची चाचणी घेऊन निवड केल्यानंतर पुणे संघातील एका खेळाडूच्या कोच व पालकांनी निवड समितीच्या पारदर्शकतेवरच आक्षेप घेतला.
अन्य विजेता संघातील तीन खेळाडंूची निवड करण्यात आली. मात्र, पुणे संघातील केवळ दोन खेळाडूंची निवड केल्याने निवड समितीने सूर्यवंशी नामक खेळाडूला हेतुपुरस्सरपणे डावलल्याचा आरोप पालकांद्वारे करण्यात आला. प्रशिक्षकासह खेळाडूच्या आई-वडिलांनी उपसंचालक प्रतिभा देशमुख यांचे कक्ष गाठून न्यायाची मागणी केल्याने गोंधळ उडाला होता. आई-वडिलांच्या लेखी तक्रारीवरून पुढील कारवाईसंदर्भात दिशा ठरविण्यात येईल, अशा सूचना उपसंचालकांनी दिल्यात. त्यानुसार खेळाडूच्या वडिलांनी निवड समितीवर आक्षेप नोंदविणारी तक्रार दिली असून याप्रकरणाकडे लक्ष लागले आहे.