मेळघाटचे प्रश्न राज्यपालांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:14 PM2017-11-23T23:14:38+5:302017-11-23T23:15:13+5:30
मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. आदिवासींची कैफियत मांडताना राणांनी रोजगार, पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीची मागणी केली.
आदिवासींचा विकास, समस्यांचे निराकरण होत नसेल तर ही जबाबदारी राज्य घटनेनुसार राज्यपालांकडे सोपविली आहे. त्याअनुषंगाने आ. राणांनी विकासापासून कायम वंचित असलेल्या मेळघाटच्या विकासासाठी राज्यपालांकडे धाव घेतली. मेळघाटात वनवैभव, व्याघ्र प्रकल्प, पर्यटन वाढीस चालना, आयुर्वेदिक वनौैषधी साठा असताना विकास का झाला नाही? याबाबतची कैफियत राज्यपालांच्या दरबारात मांडली. तब्बल तासभर चालेल्या चर्चेत आ. राणांनी राज्यपालांंना मेळघाट आपण दत्तक घेऊन आदिवासींना न्याय प्रदान करावा, अशी मागणी केली. रस्ते, गावांचा कायापालट करताना आदिवासींना पायाभूत सुविधा देण्याबाबतही त्यांनी आर्जव केले. महसूल उत्पन्नाच्या २५ टक्के वाटा हा मेळघाटातील ग्रामपंचायतींना देण्याबाबतची मागणी केली. मेळघाट कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असून हा कलंक दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकासासाठी भरीव निधी द्यावा, चिखलदरा पर्यटनासाठी निधी मिळावा, बेलोरा विमानतळाचा विकास, धारणी प्रकल्प कार्यालयात वरिष्ठ आयएएस अधिकारी नियुक्त करण्यात यावे, दळण- वळणाच्या सोईसुविधा, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सुटावेत आदी समस्या, प्रश्नांवर राज्यपालांचे आ. राणांनी लक्ष वेधले. दरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सचिव आणि उपसचिवांना मेळघाट समस्यांबाबत नोंद घेण्याचे कळविले. यासंदर्भात राज्य शासनाला अंमलबजावणीच्या कार्यवाहीसाठी आदेशित करण्याचे निर्देश दिले.