अभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:27 AM2018-08-21T01:27:30+5:302018-08-21T01:29:12+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला. कुलगुरूंच्या दालनाकडे आगेकूच करताना कुलसचिवांसोबत त्यांचा शाब्दिक वाददेखील झाला. कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
युवा स्वाभिमान पार्टीचे शहर उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध एल्गार पुकारला. आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असता, कुलसचिव अजय देशमुख यांनी त्यांना रोखले. कुलगुरू दालनात नाही; त्यांचे दालन उघडता येणार नाही, अशी नियमावली त्यांनी सांगितली. मात्र, आम्ही कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या मांडूच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यानंतर कुलसचिवांच्या आदेशानुसार सुरक्षा यंत्रणेने प्रशासकीय इमारतीचे प्रमुख प्रवेशद्वार बंद केले. विद्यार्थ्यांनी या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. कालांतराने कुलगुरू चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख या विद्यापीठाच्या प्रमुख तिन्ही शिलेदारांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले. यासंदर्भात २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविल्यानंतरही उत्तरपत्रिकेवर ‘नॉट अटेम्ट’ असे नमूद आहे. परीक्षेस हजर असूनही महाविद्यालयांच्या चुकीमुळे त्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थिती दर्शविली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता ‘कॅरीआॅन’ जाहीर करून त्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शुभम भांडे, दीक्षा सिरसाठ, सुफियान काझी, दर्शन वानखडे, शुभम कलाने, कार्तिक शेवतकर, अमृता वाटाणे, शिवानी माने, प्रफुल्ल फरकडे, शाम मापारी, राहुल आळे, अभिलेख सुखदान, प्रणय तलवारे, अधीक्षा लव्हाळे, अभिनव कडू, श्याम कडू, अमृता धांडे, अजय खासबागे, आनंद दांडगे, विवेक सोनोने, प्रथमेश भाकरे, पीयूष कोटरांगे, अक्षय डवरे, ऋषीकेश पोहरे, शुभम काळमेघ आदींनी आपल्या व्यथा मांडल्या.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी केली जाईल. आंदोलकांनी निवेदन दिले. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
- राजेश जयपूरकर
प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ