लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा, केंद्रांवर तुडुंब गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 05:00 AM2021-05-07T05:00:00+5:302021-05-07T05:00:54+5:30
जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लस पोहोचली. मात्र. सकाळपासूनच शहरातील बहुतांश केंद्रावर लसीकरणासाठी रांगा होत्या. येथील दस्तुरनगरातील केंद्रावर शारीरिक अंतराचा फज्जा दिसून आला. ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याने येथे काही वेळ तारांबळ उडाली.
जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे वितरण करण्यात आले. मात्र, आता नागरिकांनी लसीकरण करण्याची मानसिकता तयार केली असताना आरोग्य प्रशासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. गुरुवारी तरुणांसाठी आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या लसींचा डोस घेण्यासाठीच लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांना लसींचा पहिला डोस केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. गुरुवार केंद्रांवर लस येणार म्हणून अनेकांनी सकाळी ६ वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस मिळणार नाही, असे केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगताच रांगेत उभे राहून परतावे लागले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्थानक मार्गालगतच्या संत गजानन महाराज मंदिरामागे ईर्विनचे केंद्र, दस्तुरनगर येथील लसीकरण केंद्र, मसानगंज येथील महापालिका शहरी आरोग्य केंद्रातही अनेकांना लसीविना परतावे लागले, हे विशेष. केंद्रावर होणारी गर्दी कोरोना संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत आहे. प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन ठरविल्यास सावळागोंधळ निस्तारेल.
जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर गुरूवारी कोविशिल्ड १३ हजार तर, कोव्हॅक्सिनचे १२ हजार लसींचे डोस वितरित करण्यात आले. यावेळी लस येण्यास विलंब झाला असून, सातत्याने शासनाकडे लसींची जादा मागणी केली जात आहे.
-दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती
केंद्रावर सोई-सुविधांचा अभाव
ऊन तापत असल्याने ज्येष्ठ नागरिक अधिक वेळ रांगेत उभे राहू शकत नाही. मात्र, लसीकरण केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा नसल्याने अनेकांना रांगेत ताटकळत राहावे लागते. महापालिका, आरोग्य प्रशासनाने ज्येष्ठांसाठी किमान बसण्याची व्यवस्था करावी, पिण्याचे पाणी, सावलीत उभे राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसनचंद साहू, तुकाराम मेश्राम यांनी केली.
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी?
ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस उपलब्ध नसताना ऑनलाईन नोंदणी स्वीकारण्यात आली. निश्चित वेळेत येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रावर लसीकरणासाठी पोहोचलो असता ४५ वर्षांवरील व्यक्तींना केवळ दुसरा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी कशासाठी स्वीकारली जाते, असा सवाल रिपाईं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे यांनी उपस्थित केला आहे.