नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:46+5:302021-03-25T04:13:46+5:30
शेतकरी हवालदिल, भाजप कार्यकर्ते मोर्शी तहसीलवर धडकले मोर्शी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्यात येऊन ...
शेतकरी हवालदिल, भाजप कार्यकर्ते मोर्शी तहसीलवर धडकले
मोर्शी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी २४ मार्च रोजी मोर्शी तहसील कार्यालयावर धडकले. तालुकाध्यक्ष देवकुमार बुरंगे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांकरिता निवेदन देण्यात आले.
तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चणा, गहू, संत्रा मोसंबी, फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पुन्हा चार दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. वातावरणातील बदलांमुळे तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे रबीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
निवेदन देताना पंचायत समिती सभापती वीणा बोबडे, भाजपचे सरचिटणीस नीलेश शिरभाते, किसान मोर्चाचे अध्यक्ष अशोक ठाकरे, महिला आघाडी अध्यक्ष वर्षा काळमेघ, माया वानखडे, भाऊराव शापाने, यादवराव चोपडे, माया खडसे, प्रमोद बोबडेसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.