ससा, कासव प्रकरणातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:25 PM2018-03-12T22:25:05+5:302018-03-12T22:25:05+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारु विक्री होत असल्याप्रकरणी कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांना कासव, ससा हे वन्यपशू दिसून आले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारु विक्री होत असल्याप्रकरणी कारवाई करावयास गेलेल्या पोलिसांना कासव, ससा हे वन्यपशू दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी हे प्रकरण वनविभागाकडे वर्ग केले. मात्र, यातील मुख्य आरोपीला वनविभागाच्या फिरत्या पथकाने जेरबंद केले असून, त्यास न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. राजकुमार वामनराव थोरात असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, परीविक्षाधीन आयपीएस पोलीस अधिकारी समीर शेख यांनी दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री होत असल्याबाबत मंगळवार, ६ मार्च रोजी धाडसत्र राबविले. मात्र, या धाडसत्रादरम्यान पोलिसांना आरोपीच्या घरातून कासव, ससा हे वन्यपशूदेखील आढळलेत. ससा, कासव हे वनविभागाच्या नोंदी वर्ग १ चे पशू असल्याने त्यांना पाळीव ठेवता येत नाही. पोलिसांनी दारु विक्रीबाबत कारवाई करून हे प्रकरण वनविभागाकडे वळती केले. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाने दहिगाव रेचा येथे राजकुमार थोरात याचे घरातून ससा, कासव जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४३, ४४, ४९, ५० व ५१ अन्वये बुधवार, ७ मार्च रोजी वनगुन्हा नोंदविला आहे. आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी वनविभागाने न्यायालयास १२ मार्चपर्यंत वनकोठडी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची वनकोठडी देखील दिली होती. परंतु, आरोपीस वनकोठडीची मुदत संपताच सोमवारी न्यायालयात हजर केले असत,ा त्यास जामीन मिळाला.
ससा, कासव हे पाळीवप्राणी नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट केले आहे. काही जण पैशासाठी घरी कासव पाळतात. परंतु कासव वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाळीव ठेवता येत नाही. अशाप्रकारची निरंतर कारवाई सुरूच राहील.
- हेमंत मीना, उपवनसंरक्षक