जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लस बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 09:49 PM2018-09-14T21:49:42+5:302018-09-14T21:50:11+5:30
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात हैदास वाढला आहे. ही बेवारस कुत्री वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे वाहने सुसाट पळविण्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी शहरातील तीन इसमांना चावा घेतला. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात हैदास वाढला आहे. ही बेवारस कुत्री वाहनांच्या मागे लागतात. त्यामुळे वाहने सुसाट पळविण्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी या मोकाट कुत्र्यांनी शहरातील तीन इसमांना चावा घेतला. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, रेबीज प्रतिबंधक लस जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे कुठेच उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी खाजगी आरोग्य यंत्रणेकडून महागडे उपचार करून घ्यावी लागत आहेत.
सध्या कुत्र्यांच्या प्रजनन संक्रमणकाळ सुरू आहे . अशा अवस्थेत शहरात मोठ्या प्रमाणात असलेली मोकाट कुत्री आक्रमक अवस्थेत असतात. त्यांच्या या काळात रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक सहजरीत्या जात असले तरी ही मोकाट कुत्री नागरिकांवर समूहाने धावून पडतात. प्रसंगी चावाही घेतात या चाव्यामुळे दुखापत झालेल्या नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेण्याकरिता शासकीय रुग्णालयात किंवा शासकीय आरोग्य यंत्रणेकडे धाव घ्यावी लागते. या पावसाळी वातावरणातच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ही लस आरोग्य विभागाकडे असणे अत्यावश्यक आहे. परंतु स्थानिक आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता, जिल्हाभरात कुठेच यंत्रणेकडे ही लस उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. ही लस अत्यंत महागडी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यासाठी शासनाने राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.
सध्या वरिष्ठ पातळीवरूनच या लसीची उपलब्धता आरोग्य विभागाकडे होत नाही.
कुत्र्यांच्या चाव्यानंतर आवश्यक असलेली प्रतिबंधक लस ही उपलब्ध नसून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह कुठेच उपलब्ध नाही.
- डॉ. संध्या साळकर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय
कुत्रा चावल्यास रुग्णाला पाच रेबीज प्रतिबंधक लशी टोचून घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये ही लस महागडी असून, सर्वसामान्यांना न परवडणारी आहे.
डॉ. हेमंत रावळे
वैद्यकीय व्यावसायिक