रबीचे २७४ कोटी कर्जवाटप रखडले
By admin | Published: March 23, 2017 12:07 AM2017-03-23T00:07:21+5:302017-03-23T00:07:21+5:30
यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे.
बँकांचा निरुत्साह : जिल्हा बँकेचा वाटपास ठेंगा
अमरावती : यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे. जिल्ह्यात ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११५ कोटी ८१ लाखांचे कर्ज वाटप झाले. विशेष म्हणजे हे कर्ज केवळ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले आहे. यात शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेने ठेंगा दाखविला आहे.
खरीप व रबी हंगाम २०१६-१७ करिता २१४५ कोटी ६८ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास देण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामासाठी १७६९ कोटी ४६ लाखांचा लक्ष्यांक होते. या तुलनेत एक लाख ६० हजार ९४० शेतकऱ्यांना १२९५ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप बँकांनी केले. ही ७४ टक्केवारी आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ३९३ कोटी ३३ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८८८ कोटी ५० लाख व ग्रामीण बँकेद्वारा १३ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास होते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना २५८ कोटी ६४ लाखांचे लक्ष्यांक असताना १ मार्चपर्यंत ४,८३१ शेतकऱ्याना ११५ कोटी ८१ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेस १२५ कोटी ४२ लाखांचे व ग्रामीण बँकांना १६ कोटीचे लक्षांक असताना या दोन्ही बँकांचे कर्जवाटप निरंक आहे.
असे आहे राष्ट्रीयकृत बँकेचे रबी कर्ज वाटप
यंदाच्या हंगामात अलाहाबाद बँकेने ३.९५ कोटी, आंध्रा बँकेने ३५ लाख, बँक आॅफ बडोदा ५६ लाख, बँक आॅफ इंडिया ५.८९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र २०.११ कोटी , कॅनरा बँक १.३५ कोटी, सेंट्रल बँक २१.२५कोटी, कारर्पोरेशन बँक ४० लाख, देना बँक ७.८१ कोटी, आयडीबीआय बँक १.७८ कोटी, इंडियन बँक १.८६ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ६८ लाख, पंजाब नॅशनल बँक १.८कोटी, स्टेट बँक २३.२१ कोटीचे वाटप केले.