शहरात जडीबुटी व्यावसायिकांचे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:49 PM2018-05-20T22:49:51+5:302018-05-20T22:50:20+5:30
जडीबुटी व्यवसायाआड नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात पुढे येत आहे. एका जडीबुटी व्यवसायीकाने महागडे चारचाकी वाहन खरेदी केल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे पाच दिवसांपूर्वी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जडीबुटी व्यवसायाआड नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात पुढे येत आहे. एका जडीबुटी व्यवसायीकाने महागडे चारचाकी वाहन खरेदी केल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे पाच दिवसांपूर्वी केली आहे.
परराज्यातून शहरात दाखल झालेले जडीबुटी व्यावसायिक कुठल्याही जागेवर अतिक्रमण करून जडीबुटीचा व्यवसाय थाटतात. झोपडी टाकून विविध जडीबुटींची रस्त्यावरच विक्री करतात.
दीर्घ आजार, बाळ होत नाही, लैंगिक समस्या, शक्तीवर्धक औषधीसंबंधित अनेक जण जडीबुटी व्यावसायीकांकडे जातात. मात्र, जडीबुटी व्यावसायिक ग्राहकांच्या नेमक्या कमजोरीचाच लाभ घेत त्यांच्याकडून पैसे ऐठतात. यातील काही नागरिकांना जडीबुटीचा थोडा लाभ व्हायला लागला, की त्यांच्यावर विश्वासही बसतो. मात्र, हळूहळू हे जडीबुटी व्यावसायिक त्याच ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपली दिशाभूल व फसवणूक झाल्याचे कळल्यावरही ते ग्राहक बदमानी होईल, या भीतीपोेटी पोलीस तक्रारसुद्धा करीत नाहीत. काही वर्षांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत जडीबुटी व्यावसायासंदर्भात दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ग्रामीण भागातही जडीबुटी व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी दाखल आहेत. हे जडीबुडी व्यावसायिक ग्राहकांच्या समस्यांचा लाभ घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये ऐठत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. सहजरीत्या पैसे निघत नसेल, तर हे व्यावसायिक ब्लॅकमेलसुद्धा करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. शहरातील एका व्यक्तीने पाच ते सहा दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे जडीबुटी व्यवसायाकाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामध्ये जडीबुटी चालकाजवळ महागडे वाहन खरेदी केल्याचे नमूद असून, हे व्यावसायिक इतक्या महागडे वाहन खरेदी करण्यासाठी काही तरी अवैध कामे करीत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात मुसाफीर रजीस्टर असून जे व्यक्ती परराज्यातून अमरावतीत आलेत, त्यांच्या नोंदी मुसाफीर रजीस्टरवर घ्यावा लागतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मुसाफीर रजीस्टरवर एकही नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे यासंबंधित काम पाहणाऱ्यांच्या कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.
१९ बंदुका जप्त
काही वर्षांपूर्वी बंदुक नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असताना १९ जडीबुटी व्यावसायिकांजवळ बंदुकीचे परवाने आढळून आलेत तेव्हा त्या बंदुका पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यामुळे या व्यवसायीकांजवळ बंदुकीचे परवाने असल्याचे निदर्शनास आले आहे.
एका व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामध्ये एका व्यावसायिकाने चारचाकी वाहन खरेदी केले असून, त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने चौकशी सुरू आहे.
- चिन्मय पंडित,
पोलीस उपायुक्त