उमेदवारीवरून राडा, नामांकनात गोंधळ
By admin | Published: February 4, 2017 12:03 AM2017-02-04T00:03:27+5:302017-02-04T00:03:27+5:30
ऐनवेळी तिकिट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केलेली बेदम मारहाण, बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी ‘बी-फॉर्म’ वाटपाचा घेतलेला पावित्रा ...
‘आॅनलाईन’ची डोकेदुखी : ‘बी-फॉर्म’ वाटपावरून वाद
अमरावती : ऐनवेळी तिकिट कापल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केलेली बेदम मारहाण, बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी ‘बी-फॉर्म’ वाटपाचा घेतलेला पावित्रा आणि आॅनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ ही नामाकंन प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीची वैशिष्ट्ये ठरली.
२७ जानेवारीपासून महापालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामाकंन दाखल करण्याची मुदत होती. पक्षस्तरावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींमध्ये बंडखोरीचे चित्र काहीसे स्पष्ट झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध पावित्रा घेतला. त्यामुळे शुक्रवारी शेवटच्या दिवशी ऐनवेळी उमेदवारांची अधिकृत यादी घोषित करण्यात आली आणि त्याचवेळी ‘बी फॉर्म’चे वाटप करण्यात आले. यायादीत नाव कुणाचे तर, बी-फॉर्म दुसऱ्यालाच असा प्रकार घडला. यामुळे असंतोष उफाळून काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते यांना मारहाण झाली.
सायबर कॅफेवर चिकार गर्दी
अमरावती : सर्वच पक्षीय उमेदवारांसाठी आॅनलाईन नामांकन भरणे अडचणीचे ठरले. त्यामुळे ‘बी-फॉर्म’ घेण्याच्या लगबगीसह दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली. पक्षाच्या अनेक अधिकृत उमेदवारांना दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाचा अधिकृत ‘बी फॉर्म’ न मिळाल्याने अपक्ष म्हणूनच नामांकन दाखल करावे लागले. ४ फेब्रुवारीला होणाऱ्या छाननीमध्ये ‘बी-फॉर्म’वाटपात झालेल्या गोंधळाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुलाखती देऊनही वेळेवर ‘बी-फॉर्म’आणि पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी आपआपल्या पक्षांच्या नावे शिमगा केला. अनेक विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापल्याने बंडखोरी उफाळून आली. वेळेवर तिसऱ्याच पक्षाचा ‘बी फॉर्म’ घेऊन अनेक इच्छुकांनी पक्षांचे लेबल लावून घेतले.
सायबर कॅफे चालकांनी तर उमेदवारांची अक्षरश: लूट केली. आॅनलाईन नामांकन भरुन देण्यासाठी काही कॅफेचालकांनी दोन ते पाच हजार रूपये उकळले. त्यामुळे उमेदवारांच्या संतापात आणि गोंधळात भर पडली. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘बी-फॉर्म’ आधीच वितरीत केले असते तर गोंधळ उडाला नसता, अशी सांघिक प्रतिक्रिया सर्वपक्षीय इच्छुक आणि बहुतांश उमेदवारांमधून उमटली. चारही प्रमुख पक्षांनी शुक्रवारी अगदी वेळेवर ‘बी-फॉर्म’चे वाटप केल्याने राजकीय गोंधळात भर पडली. शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना बी-फॉर्मचे वाटप होत असताना बंडखोरी उफाळून आली. शहराध्यक्ष अकर्ते यांच्या अंगावर धाऊन जात इच्छुक उमेदवाराने राडा केला. त्यांची कॉलर ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर अकर्ते यांच्या जवळ असलेले बी-फॉर्म पळवून नेण्यात आले.
गडगडेश्वर प्रभागातील एका जागेची उमेदवारी अन्य एकाला जाहीर झाली असताना पळवून नेलेला बी-फॉर्म घेऊन एकाने तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती हाती आली आहे. एकंदरीतच शेवटच्या दिवशी आॅनलाईन नामांकनाने उमेदवारांची डोकेदुखी वाढवली. (प्रतिनिधी)
सहाशेपेक्षा अधिक नामांकन दाखल
अमरावती - झोन क्रमांक १ मधून ९८, झोन २ मधून १०९, झोन ३ मधून ८७, हमालपुरा झोनमधून ८३, राजापेठ मध्यझोनमधून ७९, भाजीबाजार झोनमधून ७८ तर बडनेरा झोनमधून ११३ नामांकन शुक्रवारी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी बुधवारपासून आॅनलाईन नामांकन दाखल करण्यास वेग आला होता. उशिरा सायंकाळपर्यंत महापालिका निवडणूक विभागाकडेही नामांकनाचीएकूण संख्या नव्हती. शनिवारी छाननीदरम्यान एकूण नामांकनाची संख्या निश्चित होईल.