नवसारीतील सोनोने हॉस्पिटलमध्ये राडा; परस्परांविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:36 PM2020-01-09T22:36:36+5:302020-01-09T22:36:39+5:30
महात्मा फुलेनगर रहिवासी बाळू इंगळे नामक रुग्ण डॉ. संदीप सोनोने यांच्या रुग्णालयात दाखल होता.
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी परिसरात सोनोने हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात गुरुवारी सकाळच्या वेळी राडा झाला. या प्रकरणात दोन्ही पक्षांकडून तक्रार दाखल करण्यात आली. मारहाणीचा आरोप दोन्ही पक्षांकडून करण्यात आला.
महात्मा फुलेनगर रहिवासी बाळू इंगळे नामक रुग्ण डॉ. संदीप सोनोने यांच्या रुग्णालयात दाखल होता. या रुग्णाबाबत विचारपूस करण्यासाठी बुधवारी रात्री नातेवाईक गजानन किसन तायडे हे रुग्णालयात गेले होते. यादरम्यान डॉक्टरांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून डॉक्टरांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गजानन तायडे यांनी तक्रारीतून केला आहे. त्या आधारावर डॉ. संदीप सोनोने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, बुधवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर गुरुवारी सकाळी गजानन तायडे हा काही महिलांसह रुग्णालयात आला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाºयांसोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. असभ्य वर्तन केले, असा आरोप डॉ. संदीप सोनोने यांनी तक्रारीतून केला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन तायडेसह संबंधित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला, अशी माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गाडगेनगर पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरू केली आहे.