रघुवीरचे दर सर्वाधिक, तरीही ‘सेल्फ सर्व्हिस’
By admin | Published: September 19, 2016 12:10 AM2016-09-19T00:10:51+5:302016-09-19T00:10:51+5:30
रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे;...
पाण्यासाठी उष्टे ग्लास : ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे दररोज उल्लंघन
अमरावती : रघुवीर प्रतिष्ठानामध्ये कचोरीत आढळलेल्या अळीने तेथील खाद्यान्न खात्रीदायक नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तथापि सर्वाधिक दर आकारूनही या प्रतिष्ठानात ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविली जात नाही. योग्य व समाधानकारक सेवा हा ग्राहक हक्क व संंरक्षण कायद्यानुसार ग्राहकांचा हक्क आहे. मात्र, ग्राहकांसाठी असलेल्या या कायद्याचे 'रघुवीर'कडून सातत्याने उल्लंघन होत आहे.
खाद्यपदार्थांच्या विक्रीचा थेट संबंध ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित आहे. खाद्यान्न विक्रेत्यांवर विश्वास ठेवूनच ग्राहक हे पदार्थ खरेदी करतात. मात्र, प्रतिष्ठित रघुवीरच्या कचोरीत आढळलेली अळी ग्राहकांच्या त्या विश्वासाला तडा देणारी ठरली आहे. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. बुधवारा येथील बंडू बाबरेकर यांनी रघुवीरमधून कचोरी घेतली आणि त्या कचोरीत अळी आढळून आली. त्यांनी आल्या पावली परत फिरून रघुवीरच्या संबंधित कर्मचाऱ्याला अळी असलेली कचोरी दाखविली. त्याने लागलीच कचोरी ताब्यात घेतली. चुकीची कबुली दिली. मात्र, त्यांना पैसे परत केले नाहीत किंवा त्या मोबदल्यात दुसरा नाश्ता देण्याचे सौजन्यदेखील दाखविले नाही. ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यात ग्राहकांना योग्य सेवा पुरविणे, व्यावसायिकांना बंधनकारक आहे. ग्राहकांना वस्तू किंवा खाद्यान्न विक्री करताना ग्राहकांचे समाधान होणे, ग्राहकांशी योग्य व्यवहार व वागणूक देणे या बाबी कायद्यात नमूद आहेत. मात्र, रघुवीरमधून कचोरी विकत घेणाऱ्या ग्राहकाचे समाधान तर झाले नाहीच. उलट त्याचे पैसे सुद्धा परत देण्यात आले नाहीत. ही बाब ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारीच आहे. दर्जेदार नाश्त्याचा दावा करणाऱ्या ‘रघुवीर’मध्ये समाधान होत नसल्याचा अनुभव आलेल्या अनेकांनी त्यांचे अनुभव मुद्दामच 'लोकमत'शी शेअर केलेत. यात डॉक्टर्स, अधिकारी, सामान्य नागरिक आणि महिलांचा समावेश आहे.
ग्राहक शेकडो, पाणी पिण्यासाठी ग्लास दोन
रघुवीरमध्ये ग्राहकांसाठी जेथे पाण्याची सोय करण्यात आली, तेथे एक किंवा दोन ग्लास पाणी पिण्यासाठी ठेवण्यात येतात. दररोज शेकडो ग्राहक या दोनच प्याल्यांनी पाणी पितात. ग्राहकांना त्यातून आजार संक्रमित होतो. रघुवीरमध्ये जाणारी कुणीही व्यक्ती त्यांच्या स्वत:च्या घरी कुण्या दुसऱ्या व्यक्तीने उष्टा केलेल्या प्याल्याने पाणी पीत नसतीलच; तथापि रघुवीरमध्ये मात्र अवघ्या अमरावतीत सर्वाधिक दर देऊन बहुतांश ग्राहक हक्क विसरून उष्ट्या प्याल्याने पाणी पितात. फार फार तर प्याला विसळून घेतात. जे प्याले ग्राहकांसाठी ठेवले जातात, त्याच प्याल्यांनी रघुवीरचे मालक पाणी का पीत नाहीत? जे स्वत:ला चालत नाही, ते इतरांना पैसे आकारूनही का दिले जाते?
ग्राहक हक्क व संरक्षण कायद्यानुसार व्यापाऱ्यांनी ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविणे व योग्य वागणूक देऊन त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे बंधनकारक आहे. रघुवीरमध्ये स्वयंसेवा आहे आणि ग्राहकांना योग्य सुविधा, वागणूक नसणे ही बाब कायद्याचे उल्लघंन करणारी आहे.
- अजय गाडे, जिल्हा संघटक मंंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत