रोहयोच्या आरोपींना राजाश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:07 PM2018-04-29T22:07:02+5:302018-04-29T22:07:28+5:30
धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील ग्राम पळसकुंडी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी वनक्षेत्र अधिकारी व नायब तहसीलदार यांना अटक होऊ नये, यासाठी चक्क मंत्रालयातून सूत्रे हलल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील ग्राम पळसकुंडी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी वनक्षेत्र अधिकारी व नायब तहसीलदार यांना अटक होऊ नये, यासाठी चक्क मंत्रालयातून सूत्रे हलल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे धारणी पोलिसांनी दिवसभर ताब्यात घेतलेल्या नऊ आरोपींना समज देऊन पसार होण्यास मदत केली, अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
रोहयोत कामात अपहार झाल्याची बाब वरिष्ठ वनाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी क्षुल्लक गणली गेली. मात्र, धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांनी यातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी ३५४ पानांचा अहवाल तयार केला होता, याचे भान वरिष्ठांनी ठेवणे गरजेचे आहे. अपहार एक रुपयाचा असो की कोटींचा, तो अपहारच गणला जातो. तशी शासन नियमावली आहे. असे असताना राज्य शासनाचे एक कक्ष अधिकारी व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी त्याकरिता एका बड्या पोलीस अधिकाºयांसोबत संवाद साधून हस्तक्षेप केला.
गुन्हे दाखल झाले तरी अटक करू नका; मधला मार्ग काढा, असे म्हणत ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना ‘रीलीफ’ मिळायला पाहिजे, असा संवाद झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच २६ एप्रिल रोजी सकाळपासून चौकशीसाठी ताब्यात असलेल्या नऊ आरोपींना रात्री ११ च्या सुमारास समज नोटीस बजावून पुन्हा दुसºया दिवशी चौकशीला हजर राहण्याच्या सूचनेवरून सोडून देण्यात आले. मात्र, २९ एप्रिल उजाडले तरी आजही सर्व आरोपी पसार आहेत.
विशेषत: धूळघाट रेल्वेच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण, नायब तहसीलदार प्रमोद शिंगाडे यांना पुरेपूर वाचविण्यासाठी पोलीस, महसूल आणि वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जोरकसपणे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
रोहयो कामात अपहार झाल्याप्रकरणी धारणीचे पोलीस निरीक्षक एल.के. मोहंडुले यांनी फिर्याद नोंदवून २६ एप्रिलच्या मध्यरात्री धूळघाट रेल्वेच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण, नायब तहसीलदार प्रमोद शिंगाडे, वनरक्षक सविता बेठेकर, रत्नदीप गायकवाड, शरद भाकरे, ज्ञानदेव येवले, एस.एस. चक्रे, डाकसेवक सखाराम मावस्कर, सेवानिवृत्त तहसीलदार ए.जी. देवकर यांच्याविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१, ४७७ अन्वये गुन्हा दाखल केला होता, हे विशेष.
पसार आरोपींची पोलिसांना माहिती
मेळघाटात रोहयो कामात अपहार झाल्याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी पसार होण्यासाठी धारणी पोलिसांनी मदतदेखील केली. किंबहुना पसार झालेले हे सर्व आरोपी कुठे दडून बसलेत, याची माहिती धारणी पोलिसांना असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आरोपींना जामीन मिळविण्यासाठी पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
वनविभागाची अब्रू वाचविण्यासाठी धडपड
धूळघाट रेल्वेच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनरक्षक सविता बेठेकर यांचा हेकेखोर कारभार, अपहारी प्रवृत्तीमुळे वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आरएफओ, फॉरेस्ट गार्ड यांनी केलेल्या प्रतापावर पांघरूण घालण्यासाठी वरिष्ठ वनाधिकाºयांना आता अन्य विभागाच्या अधिकाºयांकडे विनंती करण्याची वेळ आली आहे.