भरदिवसा तरुणींची छेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:27 PM2018-05-27T23:27:04+5:302018-05-27T23:28:31+5:30
रस्त्याने पायदळ जाणाऱ्या तीन तरुणींची दुचाकीवरील दोन तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रस्त्याने पायदळ जाणाऱ्या तीन तरुणींची दुचाकीवरील दोन तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्या सख्याहरींचा पोलिसांनी शोध चालविला असला तरी २अद्यापपर्यत त्यांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या नाहीत. छेडखाणीचा नुकताच घडलेला हा प्रकार कॅमेराबद्ध करण्यात आला. या टवाळखोरांवर पोलिसांचा अजिबात वचक नसल्याने असामजिक तत्वांना पाठबळ मिळाले आहे. छेड काढण्याचे गंभीर प्रकार सर्रासपणे घडताना सामाजिक संघटनांचे मौन शंकास्पद आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबानगरीच्या सांस्कृतिक-सामाजिक ठेव्याला गालबोट लावण्याचे प्रकार दिवसेदिवस वाढत चालले आहेत.
‘त्यांनी’ केली व्हिडिओ रेकॉर्डिंग
शहरातील एक व्यक्ती चारचाकी वाहनाने गाडगेनगरकडून जुन्या बायपास मार्गाकडे जात होते. त्यांच्या वाहनासमोरच एका दुचाकीवर दोन तरुण टवाळखोरी करीत पुढे जात होते. त्याचवेळी तीन तरुणी त्या मार्गाने पायदळ जात होत्या. त्या तरुणीच्या जवळ जाताच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने पायदळ चालणाºया एका मुलीच्या अंगाला स्पर्श केला. तिचा स्कार्फ ओढून ते दुचाकीस्वार निघून गेले. आकस्मिक घडलेल्या या प्रकाराने ती तरुणी घाबरली. हा प्रकार दुचाकीच्या मागे असलेल्या चारचाकीतील व्यक्तीने पाहिला. मात्र, त्या तरुणांचा चुकून हात लागला असावा, असे त्या व्यक्तीला वाटले. त्यानंतर पुढे ती दुचाकी आणि त्यामागेच काही अंतरावर चारचाकी वाहन बायपासमार्गाकडे जात होते. त्यातच काही अंतरावर त्या तरुणांनी पुन्हा रस्त्यावरून पायदळ जाणाऱ्या आणखी एका तरुणीची छेड काढली आणि पुढे निघून गेले. हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने त्या व्यक्तीने दोन्ही टवाळखोरांचा पाठलाग चालविला. भर दिवसात मुलींचे छेड काढली जात असल्याचा प्रकार बघून पोलिसांना कळविण्याचा विचार त्या व्यक्तीने केला मात्र, पोलीस वेळेवर पोहोचणार की नाहीत, अशी शंकाआल्याने त्यांनी मोबाईलमधील व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु करून ते टवाळखोर आणखी काय प्रताप करतात, हे टिपण्याचे प्रयत्न सुरु केले. चपराशी पुरा चौफुलीवरच दोन्ही वाहने पुढे-मागे असताना पुन्हा त्या टवाळखोर तरुणांनी पायदळ जाणाºया चार तरुणींपैकी एका तरुणीचा दुपट्टा ओढला. ती मुलगी दचकली, काही बोलण्याआधीच ते तरुण दस्तुरनगर मार्गाकडे निघून गेले. टवाळखोरांचे हे कृत्य रेकॉर्डिंग झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी टवाळखोरांचा शोध सुरू केला आहे.
तरुणींनो धाडस दाखवाच
सडक सख्याहरी छेडखाणी करीत असतिल , तर तरुणींनी प्रतिकार करून त्यांना धडा शिकवायला हवा. त्यासाठी तरुणींनी पुढे येऊन अशा टवाळखोरांच्या विरोधात पोलीस तक्रार करणे आवश्यक आहे. महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठविल्यास पोलिस यंत्रणाच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरिकही सहायभूत ठरतात. गरज आहे ती प्रतिकार करण्याची .
पोलीस कारवाईकडे लक्ष
शहरात दिवसाढवळ्या तरुणींची छेड काढल्याची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना प्राप्त झाली .पोलिसांनी दुचाकी क्रमांकांच्या आधारे त्या रोडरामियोंचे शोधकार्य सुरु केले आहे.आता पोलीस त्या तरुणांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरुणींची छेडखाणी अत्यंत गंभीर आहे. त्या व्हिडिओतील दुचाकीस्वारांना शोधण्याचे निर्देश फे्रजरपुरा ठाणेदारांना दिलेत.. त्या टवाळखोरांवर कडक कारवाई करू.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.
घडलेला प्रकार गंभीर आहे, दुचाकी क्रमांकाच्या आधारे त्या तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना त्वरित पकडू.
- आसाराम चोरमले.
ठाणेदार, फ्रेजरपुरा