सहकार विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारांचे धाबे दणाणले; खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 13, 2023 05:53 PM2023-10-13T17:53:32+5:302023-10-13T17:55:28+5:30
मोर्शी, धामणगाव तालुका चर्चेत :
अमरावती : निवडणुकीच्या लगबगीचे कामकाज आटोपल्यानंतर सहकार विभाग पुन्हा कामाला लागला आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने मोर्शी व धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथे अवैध सावकारीच्या संशयावरून दोन घरी व दुकानामध्ये बुधवारी धाडसत्र राबविले. यामध्ये खरेदीखत, कोरे मुद्रांक, शेती करारनामा जप्त याशिवाय अवैध सावकारीच्या संबंधित कागदपत्रे सापडल्याने सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले.
सहकार विभागाला प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सहायक निबंधकांना प्राधिकृत केले व त्यांनी पथक स्थापन करून छापासत्र राबविले. यामध्ये तळेगाव दशासर येथील विनोद दादाराव देशमुख यांचे घरी, दुकानात व संबंधित दवाखान्यात तीन पथकांनी छापा टाकला.
अंजनगाव सुर्जी सहायक निबंधक यांच्याकडे मोर्शी येथील अवैध सावकारी संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी मोर्शी एआर राजेंद्र भुयार, नंदकिशोर दहीकर, सुस्मिता सुपले यांचे पथक स्थापन केले व त्यांनी राधाकृष्ण कॉलनीतील अरविंद नामदेवराव गेडाम यांच्या घरी छापा टाकला.