२० गावठी दारूच्या हातभट्यांवर छापा, ५.४३ लाखांचा माल जप्त
By जितेंद्र दखने | Published: December 19, 2023 09:39 PM2023-12-19T21:39:05+5:302023-12-19T21:39:18+5:30
महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील जंगलात पोलिसांची कारवाई
जितेंद्र दखने, अमरावती: जिल्ह्याचे सिमेवरील मध्यप्रदेश राज्यातील परिसरात गावठी हातभट्टी दारू निर्मिती व ग्रामीण भागात होत असलेली वाहतुकीच्या घटना गत काही महिन्यात समाेर आल्या आहेत. अशातच महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथील यात्रा २० डिसेंबर पासून सुरू होत आहे.
या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे दृष्ट्रीने मंगळवार १९ डिसेंबर रोजी शिरजगांव पोलिस,स्थानिक गुन्हे शाखा व मध्यप्रदेशातील भैसदही पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन्ही राज्याच्या सिमा परिसरात गावठी दारू विरूध्द विशेष मोहीम राबवून भैसदही हद्दीतील खोमई येथील जंगल परिसरात पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाडसत्र राबवून अवैध दारू अडयावर धडक कारवाई केली आहे. भैसदही व अमरावती पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २० गावठी दारूच्या हातभट्ट्या नष्ट केल्या आहेत.यात १९८ टयुब मध्ये प्रत्येकी ५० किलो प्रमाणे कच्चा मोहा किंमत ४ लाख ९५ हजार रूपयाचे तसेच २९ ड्रममध्ये मोहा सडवा किंमत ४८ हजार रूपये असा एकूण ५ लाख ४३ हजार रूपायचा गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे साहीत्य व मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक विक्रम साळी,एसडीपीओ अतुलकुमार नवगीरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे,सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार,प्रविण वेरूळकर,तसेच महेंद्र गवई, पोलिस अंमलदार तसेच भैसदही प्रभारी अधिकारी अंजना धुर्वे,व अंमलदार यांनी संयुक्त कारवाई केली आहे.