सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 31, 2023 07:32 PM2023-10-31T19:32:00+5:302023-10-31T19:32:23+5:30
अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे सील, सात पथकांची कारवाई
अमरावती : अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे सहकार विभागाच्या सात पथकाने शहरात मंगळवारी सात ठिकाणी धाडसत्र राबविले. यामध्ये माजी नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांचे दोन दुकान व घराचा समावेश आहे. याशिवाय अन्य चार ठिकाणी छापे मारून अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे जप्त केली आहेत.
पथकाद्वारा तेजवानी यांच्या दोन मोबाइल शॉपी आणि रामपुरी कॅम्प येथील घर, कांचन पंकज बजोरिया (जेल रोड), किशोर मोहनलाल छाबडा (कंवरनगर), सुनील सुरेश देशमुख (चपराशीपुरा) व प्रमोेद मधुकर क्षीरे (विजय कॉलनी) या ठिकाणी पथकांनी धाडसत्र राबविले. यामध्ये कोरे धनादेश, मुद्रांक, करारनामा यासह अन्य कागदपत्र सील करण्यात आली. राजेश भुयार (सहाय्यक निबंधक, मोर्शी ), गजानन डावरे (धामणगाव रेल्वे), अच्युत उल्हे (अमरावती), कीर्ती धामणे(तिवसा), कल्पना धोपे (वरुड), राजेश यादव (अंजनगाव) व किशोर बलिंगे (दर्यापूर) या प्रमुख प्रमुखांनी ही कारवाई केल्याचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले.
सहकार विभागाचे माहितीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे सात सहाय्यक निबंधकांचे सात पथके तयार केली. प्रत्येक पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकांनी शहरातील राजापेठ, कोतवाली, गाडगेनगर, खोलापुरी गेट व फ्रेझरपूरा ठाण्या अंतर्गत सात ठिकाणी हे धाडसत्र राबविले.