रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
By admin | Published: April 16, 2016 12:08 AM2016-04-16T00:08:59+5:302016-04-16T00:08:59+5:30
शाळा, महाविद्यालयांना सुट्या आणि लग्नप्रसंगांची धूम सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळनासे झाले आहे.
‘नो रुम’चे फलक : मुंबई-पुण्याकडे ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये तोबा गर्दी
अमरावती : शाळा, महाविद्यालयांना सुट्या आणि लग्नप्रसंगांची धूम सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळनासे झाले आहे. रेल्वे खिडक्यांवर ‘नो रुम’ ची फलके झळकू लागले आहेत. तसेच एप्रिल, मे महिन्यात रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.
उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये तोबा गर्दी असणे ही नित्याचीच बाब असली तरी यावर्षी फेब्रुवारीपासूनच लांब पल्ल्याच्या गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. ‘समर व्हॅकेशन’मध्ये थंड हवेच्या स्थळी सहलीचे नियोजन करीत असताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. मुंबई, पुणे कडे ये- जा करणाऱ्या एकूणच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याची माहिती आहे. रेल्वे हाऊसफुल्ल असल्यामुळे ट्रॅव्हल्स संचालकांनी आतापासूनच वाढीव प्रवासभाडे आकारण्यास प्रारंभ केला आहे. रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत घर कसे गाठावे?, असा सवाल अनेकांसमोर उपस्थित झाला आहे. तिरुपती, कोलकाता, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली आदी शहरांकडे ये-जा करण्यासाठी प्रवाशांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एप्रिल, मे महिन्यात ‘नो रुम’चे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधून दोन महिने प्रवास करणे फारच कठीण असल्याचे चित्र आहे.
लांब पल्ल्याच्या या रेल्वेत आरक्षण नाही
हावडा-मुंबई मेल, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, कुर्ला-हावडा शालिमार एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस, ओखापुरी-द्वारकानाथ एक्स्प्रेस, अजमेर-पुरी एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी-हावडा डिलक्स एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे.
एप्रिल, मे महिन्यांत रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण आहे. विशेषत: मुंबई-पुणेकडे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती गंभीर आहे. समर स्पेशल गाड्या सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
- व्ही.डी. कुंभारे, वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे स्थानक