आर्णी येथे रेल्वेचे आरक्षण केंद्र; टपाल कार्यालयातून कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:41 PM2019-06-06T20:41:25+5:302019-06-06T20:41:50+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे.
अमरावती : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वेचे नवे आरक्षण केंद्र सोमवारपासून प्रारंभ झाले. हे आरक्षण केंद्र मध्य रेल्वे भुसावळ विभागांतर्गत सुरू झाले आहे. त्यामुळे आर्णी भागातील रेल्वे प्रवाशांना देशभरातील रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे सुकर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे. ज्या भागातून रेल्वे प्रवासी अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे त्या भागातील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यवतमाळात स्वतंत्र रेल्वेचे आरक्षण केंद्र असले तरी आर्णीसारख्या दूरवरच्या तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे आरक्षण केंद्र नव्हते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे आरक्षण मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, रेल्वेने पुढाकार घेत आता आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू केल्यामुळे या भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पीआरएस लिंक कार्यान्वित झाल्यामुळे सहजतेने प्रवासी वर्ग रेल्वेच्या आरक्षण तिकिटांचा लाभ घेऊ शकतील.
नव्या आरक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बडनेरा येथील मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, अमरावती येथील अभियंता आर.एस. राऊत, आर्णी येथील टपाल कार्यालयाचे अधीक्षक ए.एच. ढगे आदी उपस्थित होते.