रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘मिशन जीवन रक्षक’ ने वाचविले ६६ लोकांचे प्राण
By गणेश वासनिक | Published: November 28, 2023 03:21 PM2023-11-28T15:21:31+5:302023-11-28T15:22:42+5:30
एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान कार्यवाही, मध्य रेल्वेच्या आरपीएफने २.७७ कोटींचे प्रवाशांचे सामान केले परत.
अमरावती: मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ही रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासह प्रवाशांच्या प्राणांचे रक्षण, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावतात. त्यानुसार एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आरपीएफ जवानांनी ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचविले आहेत.
यामध्ये मुंबई विभागात १९, भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४, आणि सोलापूर विभागात ५ पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. प्रवाशी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचविला आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त ‘अमानत‘ या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख आदी परत मिळवून दिले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन 'अमानत' अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे. या ८५७ प्रवाशांपैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले.
यात भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाखांच्या किमतीचे सामान; नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख रूपये किमतीचे सामान; पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख रूपये किमतीचे सामान; सोलापूर विभाग ७२ प्रवाशांचे १३.९९ लाखांच्या किमतीचे सामानांचा समावेश आहे.
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा आदी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आरपीएफ आपली कर्तव्ये पार पाडतात. त्यामुळे प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये. जीव अमूल्य आहे.- शिवाजी मानसपुरे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे