रेल्वेची ट्रॅक सुरक्षा मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 09:47 PM2018-09-14T21:47:04+5:302018-09-14T21:47:34+5:30
रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे गाड्यांचे सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे भुसावळ विभागाने ‘ट्रॅक ’ सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. रूळांबाबतची समस्या आणि उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने गँगमनकडे मोठी जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे स्थानकाच्या हद्दिनुसार ‘ट्रॅक’ सुरक्षेने गती घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वे गाड्यांच्या अपघातांनी प्रवाशांचे नाहक जीव गमवावे लागल्याने रेल्वे मंत्रालय टिकेची धनी ठरले. मात्र, रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या तुलनेत गत एका वर्षांत रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ ला कालावधीत केवळ ४० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी बघता रेल्वे सुरक्षा रूळावर येत असल्याचे मानले जात आहे. मात्र, रेल्वे गाड्यांचा अपघात होऊ नये,यासाठी रेल्वेने नव्याने ट्रॅकची बांधणी चालविली आहे. जुने रूळ बदलविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालले आहेत. काही रूळ खासगी कंपनीमार्फत यंत्राद्वारे बदलविले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा नियमित आढावा घेतला जात आहे. मुख्य रेल्वे मार्गावर रूळांबाबत कोणतीही समस्या, प्रश्न असल्यास संबंधित अधिकाºयांकडून त्वरेने सोडविली जात आहे. ट्रॅकचे सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि सुरक्षा यंत्रणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गँगमनकडे विशेष मोहीम म्हणून काही स्वतंत्र चमू तयार करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी रूळांचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. रात्रीला गँगमनने किमान २१ किमी.पर्यंतचे पायदळ सुरक्षावारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पुलांवरील ट्रॅक सुरक्षेवर विशेष लक्ष
आतापर्यंत रेल्वे गाड्यांचे अपघात हे पुलांवर सर्वांत जास्त झाले आहेत. त्यामुळे रेल्वे रूळांवरील जुने, नवीन पुलांची दुरुस्ती, डागडुजीला प्राधान्य देण्यात येत आहे. या कामाने वेग घेतला आहे. ट्रॅकच्या सुरक्षेशी संबंधित कोणत्याही उणिवा असणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ विभागीय अभियंता (पीआयडब्ल्यू) या विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
रेल्वे रूळांच्या सुरक्षेबाबत सतत सतर्कता बाळगली जाते. गँगमनकडे विशेष जबाबदारी आहे. २१ कि.मी.पर्यंत पायी चालून गँगमन रूळांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेत आहे. काही ठिकाणी आम्ही जातो. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.
- यू. पी. पटेल, वरिष्ठ विभागीय अभियंता, बडनेरा