पाऊस गायब, उन्हाचा तडाख्याने पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:16+5:302021-08-14T04:16:16+5:30
फोटो - सिंगल सोयाबीन चांदूर बाजार : जून-जुलै मधील पावसाच्या २० दिवसानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. ...
फोटो - सिंगल सोयाबीन
चांदूर बाजार : जून-जुलै मधील पावसाच्या २० दिवसानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे बाल्यावस्थेतील खरीप पिकांची जोमात वाढ झाली. कापूस व सोयाबीन ही मुख्य पिके फुलोरा अवस्थेत आहेत. या अवस्थेत पिकांना पाण्याची जास्त गरज असते. परंतु, गत १५ दिवसांपासून तालुक्यात पाऊस नाही. सध्या तालुक्यात पाऊस गायब आणि उन्हाचा तडाखा अधिक असल्याने पुन्हा एकदा खरिपातील पिके संकटात सापडली आहे.
तालुक्यात १५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे त्याचा फटका पेरणी झालेल्या ४२ हजार हेक्टरवरील पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पंधरा दिवसांच्या पावसाच्या मोठ्या खंडाने १४ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर पावसाच्या मोठ्या खंडाने खोडकिडीसोबतच मूळकुज, खोडकुज,येलो व्हायरस, ग्रीन व्हायरस या रोगाचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आजच सोयाबीनची उत्पादकता ५० टक्क्यांनी घटणार, हे स्पष्ट दिसत आहे.
कपाशी,तूर व ज्वारी यांची वाढ खुंटली आहे. अशातच पावसाच्या खंडाने या पिकांवर विविध रोग-किडींचे आक्रमण झाले आहे. कपाशीवर गुलाबी बोंडअळीने ऑगस्ट महिन्यातच आपले बस्तान मांडले. मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचेही प्रमाण वाढले आहे. इतर किडींपेक्षा गुलाबी बोंड अळी ही कापसाला जास्त धोकादायक आहे. तूर या पिकांची सध्याची अवस्था ही फुटवे करण्याची आहे. पावसाच्या ताणामुळे फुटव्यासह तुरीच्या पिकाचीही वाढ खुंटली आहे. इतरही पिकांची अवस्था दयनीय आहे. येत्या चार ते पाच दिवसात पाऊस न आल्यास तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था अधिकच भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------------
सोयाबीन पिकाला फुलोरा ते शेंगा धरण्याचे अवस्थेत पावसाची सर्वांत जास्त आवश्यकता असते. याशिवाय अलीकडे सोयाबीनचे लवकर तयार होणारे वाण पेरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे या पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जातींना बसणार आहे.
- डॉ. समीर जोशी, बेलोरा, ता. चांदूर बाजार
------------
आणखी कोट येत आहे.