मेळघाटात पुन्हा पावसाचे थैमान; ४० गावे ‘नॉट रिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:40 AM2019-08-09T01:40:47+5:302019-08-09T01:42:00+5:30
तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे.
पंकज लायदे/श्यामकांत पांडेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोहोचली आहे. ४८ तासांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व माध्यमाच्या शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान, दिया, उतावली गावाजवळील पुलावरून सिपना नदीचे पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिसतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. दिया-बैरागड व कुसुमकोट- राणीगाव या मार्गावरील नागरिकांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
मंंगळवार मध्यरात्रीपासून पावसाने चांगला जोर धरल्यामुळे मेळघाटातील सिपना, गडगा, तापी या मुख्य नद्यांसह परिसरातील नदी-नाले ओसांडून वाहत आहे. गुरुवारी सकाळी अतिपावसामुळे दिया गावाजवळील सिपना नदीवरील पूल व धारणीपासून पाच किलोमीटर अंतरावरील रोहणीखेडा गावाजवळील गडगा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दोन्ही मार्गावरील ४० पेक्षा अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या मेळघाटातील तलाव ओवरफ्लो झाले आहेत. अतिपावसामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्याचे लेखी पत्र व मुनादी देण्याची सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे. धारणी तालुक्यातील धारणी महसूल मंडळात १०८.२ मिमी, सावलीखेड्यात १३६ मिमी, धूळघाट १२६ मिमी, हरिसाल मंडळात १३० मिमी पाऊस पडला. तालुक्यातील खारी, रबांग, नांदुरी, लवादा , गावलांडोह, मांडवा, जुटपानी हे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७६६.३ मिमी पावसाची नोंद झाली. चौराकुंड ते खोकमार मार्गावरील नदीचा पूल वाहून गेला. हा पूल गुगामल वन्यजीव अंतर्गत चौराकुंड व्याघ्र प्रकल्पाच्या अति दुर्गम जंगलात असल्यामुळे माहिती मिळू शकली नाही. भवर नदीवरील पुलाच्या कडा तुटल्याने दुचाकीचीच वाहतूक होत आहे.
या गावांचा तुटला संपर्क
दिया गावाजवळच्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने उकुपाटी, निरगुडी, धारणमहू, केकदाबोड, चटवाबोड, भोंडीलावा, बैरागड, खामदा, खोकमार, हरदा या गावांचा संपर्क तुटला. उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पोहरा, हदोर्ली, चाकरदा, कारादा, पाटिया, आठनादा या गावांचा संपर्क तुटलेला आहे . गडगा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे रोहणीखेडा येथील पूल पाण्याखाली आला. परिणामी रोहिणीखेडा, बोबदो, दाबिदा, खारी, अंबाडी, नागोठणा, झिल्पी, साद्रावाडी, सुसर्दा, सावलीखेडा, राणीगाव आदी ४० गावांचा संपर्क तुटला. चिखली रस्त्यावर सिपना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने चिखली,कारा,नांदुरी, कोट, तारूबांदा, आढाव ही संपर्काबाहेर आहेत.