पावसाची दडी, खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:59 PM2019-07-16T23:59:43+5:302019-07-17T00:00:06+5:30

यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.

Rain hazard, Kharip danger | पावसाची दडी, खरीप धोक्यात

पावसाची दडी, खरीप धोक्यात

Next
ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : दोन आठवड्यांपासून पाऊस गायब, दोन लाख हेक्टर नापेर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाचा ४० टक्के पावसाळा आटोपला असताना ४५ टक्के पावसाची तूट आहे. सध्या दोन आठवड्यांपासून पेरण्या थबकल्या असल्याने किमान दोन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पेरणी झालेल्या तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणीची सावट आहे. सोयाबीन फुलोरावर यायच्या काळात पेरणी होणार असल्याने सरासरी उत्पादनात निश्चित घट होेणार आहे. यंदाच्या खरिपासाठी हा आपदा स्थितीचा काळ आहे. कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पिकांचे आपत्कालीन नियोजन देण्यास गाफील कृषी विभाग ही शोकांतिका आहे.
यंदाच्या खरिपात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर आर्द्राच्या मध्यात दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारली ती सध्याही कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याची हाकाटी हवामान विभागाने उठवली. मात्र, पावसाने या भाकितांना दाद दिलेली नाही. पाऊस येण्याच्या आशेने जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, चार दिवसांतच पावसाने दडी मारली. १५ दिवसानंतरही कायम आहे. त्यामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे, पेरलेल्या तीन लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
यंदा १ जून ते १६ जुलै या कालावधीत पावसाची २८८.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजेच ४६ दिवसांत १३२ मिमी पाऊस कमी झालेला आहे. जिल्ह्यात पावसाची ५४ टक्के सरासरी आहे. सद्यस्थितीत चौदाही तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. वरूड, भातकुली तालुक्यात पावसाची ३५ टक्क्यांच्या आत सरासरी आहे. काही तालुक्यांत २ जुलै, तर काही तालुक्यांत ४ जुलैपासून पावसात खंड राहिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २५ जुलैनंतर मान्सून पुन्हा जिल्ह्यासह विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, या अवधीत पिकांना व पेरणी झालेल्या क्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे. ही आगामी दुष्काळ अन् नापिकीची चाहूल असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे
पावसाळा १६ जुलैनंतर सुरू झाल्यास २५ टक्के बियाण्यांचा वापर जास्त करावा आणि रासायनिक खताचा वापर २५ टक्क्यांनी कमी करावा. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सुधारित वाणांचा वापर करावा. मूग व उडिदाची पेरणी टाळावी. देशी कपाशीचे सरळ वाण वापरावे. कपाशीच्या ओळी कमी करून त्यामध्ये एक किंवा दोन ओळी तुरीच्या घ्याव्यात. २५ जुलैपर्यत सोयाबीनची पेरणी व त्यात तुरीचे आंतरपीक घेता येईल.
कृत्रिम पाऊस पाडणार केव्हा?
पावसाचा खंड असल्यास शासन कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याचे सुतोवाच कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांच्याच गृहजिल्ह्यात पाऊस ४६ टक्क्यांनी माघारला. वरूड मतदारसंघात आतापर्यंत फक्त ३१ टक्के पाऊस झाला. असे असताना कृषिमंत्री अन् जिल्हाधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा नागरिकांचा सवाल आहे.

Web Title: Rain hazard, Kharip danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.