पावसामुळे कापूस भिजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:31+5:30
अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या अवकाळी पावसाने पुन्हा झाडावरील फुटलेला कापूस भिजला, तर तुरीचा फुलोर गळून पडला आहे. संत्रा उत्पादकही अडचणीत आला आहे.
अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा घराच्या टिनावर हा कापूस शेतकऱ्यांनी वाळविला. पण, त्यातली आर्द्रता कमी होऊ शकली नाही. अखेर पडत्या किमतीत शेतकºयाने वजनात कटोती देत कापूस विकला. दरम्यान पाऊस थांबला.
शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्यात. परंतु १२ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान धो-धो पाऊस बरसला. यात शेतातील होता नव्हता तोही कापूस ओला झाला. याच पावसाने तुरीचाही बार गळाल्याने नुकसान झाले. तुरीचा फुलोर गळून पडला. ढगाळ वातावरणाने तुरीवर रोग, अळ्याही वाढल्या आहेत. ९ हजार ३८६ हेक्टरमधील तूर पिकाचे नुकसान झाले आहे
आधीच सुलतानी संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने घाला घातला. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खते व फवाऱ्यांचा वापर करत शेतकºयांनी कपाशीला उभारी दिली. मात्र, काल परवाच्या पावसाने पुन्हा कापसाच्या वाता झाल्या असून, दरही पडले आहेत. आता केवळ रबीतील गहू व हरभरा या दोन पिकांवर लाखो शेतकऱ्यांची मदार आहे.
आंबिया बहरवर परिणाम
सततच्या पावसात संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संत्राझाडांना तडन देता आली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यामुळे संत्राबगीचे आंबिया बहारकरिता शेतकऱ्यांनी तडनवर सोडले. परंतु गुरूवारी पडलेल्या अवकाळी पावसाने परत जमीन भिजली. यात त्या तडनवर परिणाम झाल्यामुळे पुढे फुटणाऱ्या आंबिया बहारावरही त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. बगिचे पाहिजे त्या प्रमाणात फुटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून गुरूवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याची नोंद आहे.