पावसाची दडी; मृग बहर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:02+5:30
संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : लांबलेल्या पावसामुळे यंदा संत्र्याचा मृग बहर अडचणीत आला आहे. आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
वरूड-मोर्शीच्या संत्र्याची चव आखाती देशांनी चाखली आहे. एकेकाळी वरूड तालुक्याला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणूनही ओळखले जात होते. वरूड तालुक्यात एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्रफळ संत्र्याच्या लागवडीखाली आहे. येथील बहुतांश शेतकरी मृग बहर घेण्यास इच्छुक असतात. संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.
मृग बहरासाठी एक महिन्याचा ताण आवश्यक असतो. झाडांना पाहिजे तेवढा ताण बसला नाही. पहिल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यामुळे संत्रा झाडांनी मोठ्या प्रमाणावर नवती घेतली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस बरसलेला नाही. आता फूट होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आंतरपीक म्हणून तूर किंवा सोयाबीनकडे वळले आहेत. ‘लोकमत’ ने ३ जूनच्या अंकात भाकीत व्यक्त केले होते, ते तंतोतंत खरे ठरले.
संत्र्याचा ऑनलाइन विम्याकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ती मुदत २५ जून होती.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जेथे झाडांची नवती निघाली नसेल किंवा झाड सुप्तावस्थेत असेल, तेथे संजीवक व १२:६१:०० फवारणीचे खत मिसळून तातडीने फवारणी करावी. दमदार पाऊस झाल्यास परिस्थिती बदलू शकते.
- श्यामसुंदर ताथोडे, प्राचार्य, स्व.पंजाबराव ठाकरे कृषी विद्यालय, हातुर्णा
वरूड तालुक्यातील १९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. पैकी ९ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर मृग बहर घेतला जातो. मात्र पावसाच्या दीर्घ दडीने तो हातातून जाण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचे नुकसान संभवते.
- उज्ज्वल आगरकर
तालुका कृषी अधिकारी, वरूड.
बºयाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. शासनाने संत्रा पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी. संत्र्याला पीक विम्याचे कवच मिळाल्यास शासनाचा भार काही प्रमाणात हलका होईल.
- सुधाकर दोड
संचालक, बाजार समिती वरुड