विभागात 76 टक्क्यांवर स्थिरावला पाऊस, 24 टक्क्यांची तूट : यवतमाळात अल्प पर्जन्यमान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 05:02 PM2017-10-01T17:02:07+5:302017-10-01T17:02:27+5:30
१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.
प्रदीप भाकरे
अमरावती : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.
भारतात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मान्सून कोसळतो. पावसाच्या या चार महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ७७७.९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र ३० सप्टेंबरला मान्सून संपुष्टात आल्यानंतर विभागात २४ टक्के कमी पाऊस नोंदविला गेला. अमरावतीमध्ये ८१४.५ मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४८.१ (६७.३ टक्के), अकोल्यात ६९७.३ मि.मी. च्या तुलनेत ५५० मि.मी. (७८.९ टक्के), यवतमाळच्या ९११.३ मि.मी.च्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५६२.१ (६१.७ टक्के), बुलडाण्यात ६६७.८ मि.मी.च्या तुलनेत सर्वाधिक ६६४.५ मि.मी. (९९.५ टक्के), तर वाशिम जिल्ह्यात ७९८.७ मि. मी.च्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत ५८१.३ मि.मी. अर्थात ७२.९ टक्के पाऊस नोंदविला गेला.
अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्याचे प्रत्यक्ष पर्जन्यमान ७६ ते ९९.५ टक्के राहिले, तर उर्वरित अमरावती, यवतमाळ व वाशिममध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला.
यवतमाळात ३८.३ टक्के पावसाची तूट
विभागाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ३८.३ टक्के, अमरावतीमध्ये ३३ टक्के, अकोल्यात ११ टक्के, बुलडाण्यात ०.५ टक्के, तर वाशिममध्ये २७.१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली.
सर्वात कमी पावसाचे तालुके
अमरावतीमधील धारणीत ५८ टक्के, अकोल्यातील पातूरमध्ये ६४.६, यवतमाळातील कळंब तालुक्यात ३३.५ टक्के, बुलडाण्यातील शेगाव तालुक्यात ७५.८ टक्के आणि वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात ५२.४ टक्के इतका अल्प पाऊस पडला. पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत या पाच तालुक्यात पर्जन्यमानाची सर्वाधिक तूट नोंदविली गेली.