पावसाची हूल, कर्जाची झूल; शेतकऱ्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:04 AM2017-07-19T00:04:21+5:302017-07-19T00:04:21+5:30
यंदाच्या खरिपात सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ३०१ मिमी कमी पाऊस झाल्याने ....
‘कमबॅक’केव्हा ? : गतवर्षीच्या तुलनेत ३०१ मिमी कमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरिपात सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली. सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ३०१ मिमी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात किमान दीड लाख हेक्टरक्षेत्रात मोड व दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पावसाने अद्यापही ‘कमबॅक’ केले नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. अशा विपरीत स्थितीत खरीप कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना झुलवीत आहेत. तातडीच्या कर्जासाठी दीड लाखांवर शेतकरी पात्र असताना केवळ दहाच शेतकऱ्यांना तातडीचे १० हजारांचे कर्जवाटप केल्यामुळे यंदाचा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.
खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार ११२ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत चार लाख ५६ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही टक्केवारी ६२.७ इतकी असून पावसाअभावी पेरणीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खांडण्या पडल्या आहेत. जमिनीत पुरेशी आर्द्रता नसल्याने बियाण्यांचे अंकुरण झालेच नाही. परिणामी बहुतांश क्षेत्रात मोड आले असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात १२ जुलैअखेर धान सहा हजार ४७४ हेक्टर, ज्वारी नऊ हजार ७०६, बाजरी ८५, मका चार हजार ८८७ असे एकूण तृणधान्य २१ हजार १५२ हेक्टर, तूर ७१ हजार ६१२ हेक्टर, मूग नऊ हजार ५०७ हेक्टर, उडीद चार हजार २७५ हेक्टर, असे एकूण कडधान्य ८५ हजार ३७४ हेक्टर, भुईमूग ६६२ हेक्टर, तीळ ७१ हेक्टर, सोयाबीन दोन लाख दोन हजार ७२२ हेक्टर, तर कपाशी एक लाख ४६ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत फक्त ५३ टक्केच पाऊस पडल्याने पिकांची विदारक स्थिती आहे. धारणीत ३८ हजार ५६२ हेक्टर, चिखलदरा १० हजार ७५, अमरावती ५१ हजार ४७०, भातकुली ३६ हजार ४८१, नांदगाव खंडेश्वर ५२ हजार ७७०, चांदूररेल्वे ३६ हजार २३८, तिवसा ३५ हजार २१३, मोर्शी ४३ हजार १२०, वरूड ३५ हजार ९६७, दर्यापूर १६ हजार ५३१, अंजनगाव सुर्जी ३,९००, अचलपूर १९ हजार ५०६, चांदूरबाजार ४४ हजार ९५० व धामणगाव रेल्वे तालुक्यात ३१ हजार ५१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असली तरी पावसाच्या खंडामुळे किमान दिड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पावसाअभावी दुबार पेरणीदेखील खोळंबली आहे. त्यामुळे अनुदानावर खत व बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
पावसाची दडी, दुबार पेरणीसाठी बियाण्यांचे नियोजन
जिल्ह्यात सद्यस्थितीत ६०,४९० हेक्टर क्षेत्रात मोड आली. यामध्ये ज्वार ३७० हेक्टर, तूर ११,६००, मूग १,४८०, उडीद ८४०, सोयाबीन ३७ हजार, कापूस ९,२०० हेक्टरचा समावेश आहे. याआठवड्यात पावसाचा ताण राहिल्यास ज्वार २,७०० हेक्टर, तूर ५ हजार, मूग ३ हजार, उडिद १,५००, सोयाबीन ३५ हजार, कापूस ५ हजार तसेच धान व इतर पिकात ५ हजार हेक्टर क्षेत्रात मोड येणार आहे. या दुबार पेरणीसाठी एक लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रात किमान ५३ हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.
तातडीच्या कर्जवाटपास बँकांचा ठेंगा
शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले असले तरी या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोवर अडचणीतील शेतकऱ्यांना शासनाच्या हमीवर खरीप हंगामासाठी तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे निर्देश सर्व बँकाना शासनाने दिलेत. जिल्हात एक लाख ६७ हजार शेतकरी पात्र असताना महिनाभरात बँकानी केवळ १० शेतकऱ्यांना याकर्जाचे वाटप केले आहे.
तातडीच्या कर्जासाठी एसएलबीसीव्दारा दोन दिवसांपूर्वी नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत. बँकांव्दारा १० हजारांच्या कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच निकषपात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येईल.
-जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक
यंदा पीक विम्याचा लाभ मिळणे कठीणच
अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी कृषी विभागाव्दारा प्रधानमंत्री पीक विमायोजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची आहे.यासाठी ३१ जुलै "डेडलाईन" आहे. मात्र, यंदा जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ३० हजार ८३१ शेतकऱ्यांनाच खरिपाचे कर्जवाटप करण्यात आल्याने तेवढ्याच शेतकऱ्यांचा विमा काढण्यात आला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग नाममात्र असल्याने यंदा पीक विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता धुसर आहे.