पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 1, 2023 17:02 IST2023-09-01T17:00:50+5:302023-09-01T17:02:47+5:30
३९ मंडळांत २१ दिवसांवर खंड : तालुका समित्यांद्वारा पिकांची नजरअंदाज पाहणी

पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया
अमरावती : ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहिल्याने वाढीवरच्या पिकांची अवस्था बिकट झालेली आहे. पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत सरासरीच्या ६० ते ७० टक्के प्रमाणात पावसाची नोंद झाली. त्यातच ३९ महसूल मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड राहिल्याने तालुका समित्यांद्वारा नजरअंदाज पाहणी सुरू झालेली आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास खरिपावर दुष्काळछाया ओढवणार आहे.
यंदा मान्सून तीन आठवड्यांनी विलंबाने आल्यानंतर ५ जुलैनंतर दमदार आगमन केले. महिनाभर संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे साडेसात लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. ऑगस्टमध्ये चार ते सहा दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता पावसाची दडी राहिली. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांना ताण आला व वाढ खुंटली आहे. काही मंडळांमध्ये जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याने पिके करपायला लागली आहेत.