८३ कर्मचाऱ्यांकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:16 PM2019-06-03T23:16:34+5:302019-06-03T23:17:02+5:30
पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण व्हावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन आठवड्यांत नऊ विभागांतील ८३ कर्मचाºयांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण व्हावे, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन आठवड्यांत नऊ विभागांतील ८३ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविले.
शहराची लोकसंख्यावाढ झाल्याने पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्यामुळे गरजेपोटी ठिकठिकाणी बोअर केल्या जात आहेत. परिणामी भूगर्भाची चाळण होत आहे. परिणामी भूजल स्तर खालावत आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झाल्यास भूजलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रत्येक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच पर्याय असल्याने नागरिकांत जलजागृती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आयुक्त संजय निपाणे यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांनी यासाठी कंबर कसली आहे. या अभियानाची सुरूवात आयुक्तांच्या निवासस्थानाहून करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे सर्व अधिकारी अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्यात आली.
पावसाळ्यात रस्त्यांमध्ये वाहणारे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने साठविल्यास पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच कमी होईल. पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी विसंबून राहण्याची वेळ येणार नाही. शिवाय पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होईल तसेच जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होणार असल्याची जागृती महापालिका प्रशासनाद्वारा करण्यात येत आहे.
नऊ विभागांतील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
भविष्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कार्यकारी अभियंता -२ कार्यालयातील १२ कर्मचारी, उपायुक्त (सामान्य) २, सांख्यिकी विभाग ३, उद्यान विभाग ५, उत्तर झोन क्रमांक १ मध्ये १३, पूर्व झोन क्रमांक ३६, एनयूएलएम विभाग १९, ससनर विभाग २१ व कार्यशाळा विभागातील २ कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविली आहे.
शहराची भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोष खड्डा तयार करणे महत्त्वाचे आहे. महापालिकेतील ८३ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ही यंत्रणा त्यांच्या घरी बसविली आहेत.
- संजय निपाणे,
आयुक्त, महापालिका