पावसाची ओढ, दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:33+5:302021-07-04T04:09:33+5:30

अमरावती : मान्सून आगमन वेळेआधी झाले असले तरी दोन आठवड्यांपासूण पावसाची उघडीप व सहा दिवसांपासून दडी आहे. त्यामुळे जमिनीत ...

Rainy season, double sowing | पावसाची ओढ, दुबार पेरणीचे सावट

पावसाची ओढ, दुबार पेरणीचे सावट

Next

अमरावती : मान्सून आगमन वेळेआधी झाले असले तरी दोन आठवड्यांपासूण पावसाची उघडीप व सहा दिवसांपासून दडी आहे. त्यामुळे जमिनीत आर्द्रता असलेल्या भागात पिके निघाली असली तरी कोवळी पिके माना टाकीत आहेत. याशिवाय काही ठिकाणी पेरले ते उगवलेच नाही, निघाले तेथे खांडण्या आहेत. अशीच स्थिती आणखी चार दिवस राहिल्यास जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले तरी आतापर्यंत केवळ दोनच दिवस सार्वत्रिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २१६.७ मिमी पाऊस झालेला असला तरी तो विखुुरलेल्या स्वरूपात आहे. कृषी विभागाच्या आवाहनानुसार १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी केली असली तरी हवामान विभागाचा अंदाज फोल ठरल्याने शेतकऱ्यांवर आता संकट ओढावले आहे. पेरणीची वेळ अद्यापही गेली नाही. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. याशिवाय आंतरपीक घेतल्यास तेही उत्तमच, असे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. शुक्रवारपर्यंत ४,२६,६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही ६१.०५ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक १,७५१६९ हेक्टरमध्ये सोयाबीन, १,५०,८२७ हेक्टरमध्ये कपाशी, ३,९९२ धान, ५,५३७ ज्वार, ७८६२ मका, ७६,५८० तूर, २४२३ मूग, १४६६ उडीद, ८२ भुईमूग, २३७ हेक्टरमध्ये भाजीपाल्याची पिके आहेत. सर्वाधिक ७५ टक्के पेरणी धामणगाव तालुक्यात, तर सर्वांत कमी १६ टक्के पेरणी दर्यापूर तालुक्यात आहे. कोवळ्या पिकांवर आता खुरपडींचा हल्ला झालेला आहे. शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे. त्यांच्याद्वारे पिकांना जगविण्यासाठी सिंचन सुरू केले असले तरी जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहे.

बॉक्स

तालुकानिहाय पाऊस आणि पेरणी (मिमी/हेक्टर)

तालुका पाऊस पेरणी

धारणी ९४.२ ३१,५९३

चिखलदरा २०६.३ १०,८२६

अमरावती १९७.५ ४२,२९१

भातकुली १९६.२ १५,३६०

नांदगाव खं. २७२.६ ५६,४००

चांदूर रेल्वे ३३४.५ २८,७९६

तिवसा २०२.६ ३५८९३

मोर्शी १७१.८ ४३,०७३

वरूड २०९.३ २७,८५०

दर्यापूर २४५ १२,२३३

अंजनगाव २६६.५ २३,७३५

अचलपूर १६१.२ २१,५५६

चांदूर बाजार १८२.२ २६,२४०

धामणगाव २६०.७ ५०,७९३

एकूण २१६.७ ४,२६,६१२

बॉक्स

सोयाबीनचे वाढले पेरणीक्षेत्र

सोयाबीनची सद्यस्थितीत १,७५,२५२ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यंदा किमान तीन लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक ४२,३७३ हेक्टरमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पेरणी झालेली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास ६० दिवसांचे मूग, उडिदाचे पीक बाद होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे.

बॉक्स

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?’

पावसाचा पत्ता नसल्याने शहरासह ग्रामीण भागात आता धोंड्या निघत आहेत. शेतकरी देवाला साकडे घालत आहेत. महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. आता दुबारचे संकट आहे. बियाण्यांसाठी दुकानात रांगा लागल्या होत्या. अशीच गत रासायनिक खतांची असल्याने शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

कोट

दरवर्षीच परीक्षा

गतवर्षी सोयाबीन बियाणे बनावट असल्याने उगवलेच नव्हते. दुबार पेरणी झाल्यानंतर सवंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने हातचे पीक गेले. यंदाही तशीच गत होणार, असी शंका येत आहे.

- भूषण देशमुख, चांदूर बाजार

मागच्या वर्षी उशिरा पावसाने कपाशीची बोंडसड झाली व कपाशी उपटून टाकावी लागली. यावर्षी सोयाबीन लावले, तर खांडण्या पडल्या आहे. त्यात पाऊस गायब झाल्याने दुबारचे संकट आहे.

- गजानन पाटील, अमरावती

कोट

जमिनीत आद्रता असल्याने सध्या पिकांना धोका नाही. मात्र, अजून चार दिवस पाऊस न आल्यास काही भागात दुबार पेरणीची स्थिती ओढवेल. काही भागात पिकांना सिंचन सुरू आहे.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Rainy season, double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.