राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका
By गणेश वासनिक | Published: August 10, 2024 08:36 PM2024-08-10T20:36:30+5:302024-08-10T20:36:58+5:30
कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता अरविंद सावंत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
गणेश वासनिक / अमरावती
अमरावती : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. शरद पवार कसे चांगले, नरेंद्र मोदी कसे चांगले, असे आपल्या राजकीय लाभासाठी सोयीनुसार निर्णय घेतात, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी येथे केली. अमरावती येथे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आयाेजित कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता, ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
खासदार सावंत यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेणे फार चुकीचे झाले, हा विषय बाहेर येतो, नव्हे तो जाणीवपूर्वक चौकटीतून बाहेर आणला जातो. अजित पवारांना पण कळू द्या, त्यांची महायुतीत काय किंमत आहे. आता मात्र, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप होत आहे, पण यात राज्याच्या जनतेची फसवणूक हाेत आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचा हात होता. भाजपने अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे आरोप केले. नंतर या आरोपाचे समर्थन करून पवारांना नंतर क्लीन चिट दिली. एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केले. अजित पवारांविरुद्ध आरोपाचे ट्रकभर पुरावे असल्याचे सांगणारे देवेंद्र फडणवीस हेच सोबत मांडीला मांडी लावून बसत आहे. स्वार्थासाठी भाजप कोणत्या स्तरावर गेली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खरे तर महायुतीत असणारे सत्ता जिहादी आहेत. यामध्ये महाराष्ट्र लाचारी झाला, असा आरोप अरविंद सावंत यांनी महायुतीवर केला.
यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमोद कोहळे, प्रकाश मारोटकर आदी उपस्थित होते.