राज ठाकरेंकडून हरिसालची नाहक बदनामी : उपसरपंच गणेश येवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:36 PM2019-04-22T21:36:56+5:302019-04-22T21:42:49+5:30
देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. मात्र त्यांचा दावा हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी खोडून काढला आहे. राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी या माध्यमातून हरिसालची संपूर्ण देशभरात बदनामी केल्याचा आरोप, त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती(धारणी ) : देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. मात्र त्यांचा दावा हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी खोडून काढला आहे. राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, त्यांनी या माध्यमातून हरिसालची संपूर्ण देशभरात बदनामी केल्याचा आरोप, त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
राज ठाकरे यांनी आमच्या गावाविषयी राजकारण करु नये, अशी विनंती त्यांनी केली. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सांगोपांग चर्चा केली. आमच्या ‘डिजिटल व्हिलेज’ हरिसाल या गावात इंटरनेट व वायफायची सुविधा आहे. त्यामुळेच गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत ई - लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. तर गावात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. त्या बँकेचे एटीएम सर्व नागरिकांकडे आहे. गावातील काही नागरिक एटीएमचा वापर करतात. गावातील मोठ्या दुकांनदाराकडे पॉस मशिन उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा वापर सुरु आहे. या सर्व सुविधा गावात उपलब्ध आहे. सुरवातीच्या काळात या सुविधा आमच्या गावात नव्हत्या. त्या वेळी कुणीही आले नाही. सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आमच्या गावाच्या विकासाचे राजकारण करुण बदनामी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी सभेत उभा केलेला मॉडेल तरुण आमच्या गावचा नागरिक नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही, असे ते म्हणाले.
ती बाब हास्यास्पद
राज ठाकरे गावात आल्यानंतर त्यांनी हरिसालचे रहिवाशी नसलेल्या अन्य एका गावातील ७५ वर्षीय आदिवासी वृध्दाला एटीएम वापरता का? असा प्रश्न विचारला. एखाद्या आदिवासी वृध्दाला खरेच एटीएम कार्डने पैसे काढता येतिल का, तो कार्ड वापरत असेल का? त्यावर साहजिकच नाही असे उत्तर ठाकरे यांना मिळाले. त्यावर एवढा गहजब माजविला जातो, ही हास्यास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.