‘ती’च्या चंद्रमौळी झोपडीत राजयोग आश्रयाला!

By admin | Published: December 3, 2015 12:08 AM2015-12-03T00:08:16+5:302015-12-03T00:08:16+5:30

भटकंतीचे आयुष्य पाचवीलाच पुजलेले. पाठीवर बिऱ्हाड घेऊन येथून-तिथे प्रवास सतत सुरू. नशिबी अठराविश्वे दारिद्रय. असे उपेक्षित जिणे जगत असताना अचानक एक दिवस ‘नशिबा’ने तिचे दार ठोठावले.

Raja yoga in Chandramouli hut | ‘ती’च्या चंद्रमौळी झोपडीत राजयोग आश्रयाला!

‘ती’च्या चंद्रमौळी झोपडीत राजयोग आश्रयाला!

Next

नांदगाव खंडेश्वर : भटकंतीचे आयुष्य पाचवीलाच पुजलेले. पाठीवर बिऱ्हाड घेऊन येथून-तिथे प्रवास सतत सुरू. नशिबी अठराविश्वे दारिद्रय. असे उपेक्षित जिणे जगत असताना अचानक एक दिवस ‘नशिबा’ने तिचे दार ठोठावले. सोबत ‘राजयोग’ही होता. आज तिच्या मोडक्या-तोडक्या चंद्रमौळी झोपडीत राजयोग आश्रयाला आला आहे. सिनेमात शोभावी अशी ही अविश्वसनिय कथा आहे येथील पारधी बेड्यावर वास्तव्यास असलेल्या इंजिनशा अरमेश भोसले या भगिनीची. नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून इंजिनशा निवडून आल्या आणि येथील उपेक्षित, वंचित, भटक्या पारधी समुदायाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे तेज झळकू लागले.
अमरावती जिल्ह्यातील चार नगर पंचायतींची निवडणूक नुकतीच आटोपली. या निवडणुकीने त्या-त्या ग्रामपंचायतींचे भाग्य पालटले. अनेकांची प्रतीक्षा या निमित्ताने फळाला आली. मात्र, खऱ्या अर्थाने न्याय मिळाला तो येथील वॉर्ड क्र. ४ मधील फासे पारधी समाजाच्या इंजिनशा भोसले यांना. नगर पंचायत निवडणुकीत त्या वॉर्ड क्र. ४ मधून युवा स्वाभिमान पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. अवघ्या २२ वर्षांच्या इंजिनशा यांनी या निवडणुकीत ९० मतांची आघाडी घेतली. त्या निवडून आल्यात. इतकेच नव्हे तर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणइुकीत काँग्रेस-राकाँच्या आघाडीत त्या सहभागी झाल्या. एरवी पांढरपेशांच्या घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश नसणाऱ्या इंजिनशाला थोरामोठ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याचा सन्मान मिळाला.
इंजिनशा यांचे घर (?) असलेल्या वॉर्ड क्र. ४ मध्ये फासे पारधी समाजाचा बेडा आहे.

पारधी बेड्यात चैतन्य संचारले
नांदगाव खंडेश्वर : वर्षानुवर्षे उपेक्षितांचे जीणे जगणाऱ्या या समाजाला विकासाचा राजमार्ग कधी गवसलाच नाही. इतरांच्या भरवशावर विकासाची स्वप्ने पाहण्याऐवजी स्वत: विकास प्रक्रियेत सहभागी होणे केव्हाही उत्तम. पण, प्रस्थापित समाजव्यवस्थेत या भटक्यांना स्थान देणार कोण? मात्र, इंजिनशाला सुदैवाने म्हणा वा तिच्या बळकट राजयोगाच्या भरवशावर म्हणा ही संधी मिळाली आहे. आपल्या सदैव दुर्लक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी झटण्याचे आयुधच इंजिनशाला मिळाले आहे. इंजिनशाच्या या यशामुळे तिचा पती अरमेश आणि मुलगी देखील प्रचंड आनंदात आहे. एरवी तिन्ही सांजा होताच अंधारात गुडूप होणारी तिची चंद्रमौळी झोपडी आता खळखळून हसतेय. तिच्या या यशाने त्या पारधी बेड्यातही चैतन्य संचारले आहे. (प्रतिनिधी)

उपेक्षित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम नांदगाव वासीयांनी केले. यातून समाजाला वेगळी दिशा मिळू शकते.
- मतीन भोसले
अध्यक्ष, म.रा. फासे पारधी समाज संघटना

जनतेने दिलेल्या या संधीमुळे वॉर्डाच्या व पारधी बेड्याच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करेल. ही मोठी संधी मिळाली आहे.
- इंजिनशा भोसले
नगरसेविका

Web Title: Raja yoga in Chandramouli hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.