...तर ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वागतच होईल; डॉ. राजेंद्र गवई यांची स्पष्टोक्ती
By गणेश वासनिक | Published: October 4, 2022 07:23 PM2022-10-04T19:23:56+5:302022-10-04T19:55:15+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीतून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीतून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या नागपूर येथील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यक्रमात पाहुण्यांना आमंत्रित करताना कोणताही राजकीय, सामाजिक असा भेदभाव केला जात नाही. त्यामुळे बुधवारी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होऊ घातलेल्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आल्यास त्यांचे स्वागतच होईल. त्यांच्या लोकप्रियतेबाबत प्रश्नच येत नाही, अशी स्पष्टोक्ती रिपाइंचे (गवई गट) राष्ट्रीय महासचिव तथा दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र गवई यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
नागपूर येथील दीक्षाभूमीवर ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासंदर्भात ते बोलत होते. डॉ. राजेंद्र गवई यांच्या मते, गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वत्रिक धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करता आला नाही. मात्र यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसह विविध क्षेत्रांतील गणमान्य व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलावले आहे. तसेच या भव्यदिव्य सोहळ्याला विविध रिपाइंचे नेते, आंबेडकर चळवळीचे प्रमुखांना निमंत्रित केले नाही, याविषयी डॉ. गवई यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होऊ घातलेल्या सोहळ्यात लोकप्रियता बघून आमंत्रित केले जात नाही, तर हा निर्णय दीक्षाभूमी स्मारक समिती घेते. दीक्षाभूमी हे असे स्थळ आहे, जेथे मान, सन्मान, अपमान, अहंकार हा विषय येतच नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे सोहळ्यात आल्यास नक्कीच त्यांचे स्वागत केले जाईल. ते आमच्यासाठी आदरणीय असून, पुढेही राहतील. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा हा कुणाची खासगी प्रापर्टी नाही, असेही डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.
पुढील वर्षी भंते दलाई लामा येणार
पुढील वर्षी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला भंते दलाई लामा हे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहे. त्यानुसार स्मारक समिती आतापासूनच तशी तयारी करीत आहे. भंते लामा यांच्यासह आंबेडकर चळवळीत अग्रणी नेते, साहित्यिक, लेखकांना सुद्धा निमंत्रित केले जाईल, असे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.