राजगुरुंचे रायफल प्रशिक्षण अमरावतीत
By Admin | Published: March 23, 2016 12:27 AM2016-03-23T00:27:58+5:302016-03-23T00:27:58+5:30
स्थानिक पन्नालाल उद्यानात सन १९२७ मध्ये तंबू ठोकून हव्याप्र मंडळातर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते.
श्री हव्याप्र मंडळात होता मुक्काम : शहिदांच्या पदस्पर्शाने अंबानगरी पावन
इंदल चव्हाण अमरावती
स्थानिक पन्नालाल उद्यानात सन १९२७ मध्ये तंबू ठोकून हव्याप्र मंडळातर्फे उन्हाळी शिबिर घेण्यात आले होते. त्यामध्ये काशी येथील रहिवासी शहीद शिवराम हरी राजगुरू यांनी शारीरिक शिक्षणासह रायफलचे शिक्षण पूर्ण करून ‘व्यायाम विशारद’ ही पदवी मिळविली होती.
मंडळाच्या शिबिरात तरूण क्रांतिकारकांना बलोपासनेबरोबरच लाठी-काठी व इतर युद्धकलांमध्ये शिक्षण देण्याचा वर्ग काढावा, अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबारावांची इच्छा होती. त्यांनी राजगुरूंना काशी येथे एक पत्र पाठवून येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात तेथील शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून यावे, असे सुचविले होते. सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक व कलाकार कै. भालजी पेंढारकर यांनीसुद्धा त्यांच्या ‘साधा माणूस’ या पुस्तकात पान क्रमांक ७३ वर या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पंजाबहून निघालेले अनेक क्रांतिकारक अमरावती, अमळनेर तर काही मुंबई अशा ठिकाणी विखुरले होते.
या सर्वांचा एकमेकांशी संबंध ठेवण्यासाठी पोलिसांचे लक्ष जाणार नाही, अशा विश्वासू माणसाची आवश्यकता होती. अनेकदा हे काम भालबांकडे येत असे. अशाच एकाप्रसंगी भालबांची अमरावती येथील हनुमान व्यायाम शाळेत भगतसिंग वगैरेंची भेट झाली. त्यांच्या मनात ब्रिटिश राज्य हिंदूस्थानातून उधळून टाकण्यासाठी रोज काही नव्याच योजना निघत असत.
हिवरखेड येथे रायफल प्रशिक्षण
अकोट तालुक्यातील हिवरखेडचे राजस्थानी युवक लच्छूलाल हे आपली बंदूक घेऊन या उन्हाळी शिबिरासाठी आले होते. राजगुरुंनी याच बंदुकीचा उपयोग करून अचूक लक्ष्यवेधाचा सराव केला. त्यांची वृत्ती जहाल होती. स्वभाव बोलका व प्रचारी. त्यामुळे त्यावर्षीच्या वर्गात निरनिराळ्या प्रांतातून जे सार्वजनिक कार्यकर्ते आले होते. ते राजगुरूंकडे आकर्षित होत त्यांच्या भोवती नेहमी तरुणांचा गराडा पडलेला असे. मंडळावर त्यांची निष्ठा होती. त्यानंतर सुमारे दीड वर्षे राजगुरू हव्याप्र मंडळातच भूमिगत अवस्थेत राहिलेत.