राजकुमार पटेलांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:59 PM2018-02-09T21:59:35+5:302018-02-09T21:59:58+5:30
बहुचर्चित खारी प्रकरणात पोलिसांना ‘वॉन्टेड’ असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
धारणी : बहुचर्चित खारी प्रकरणात पोलिसांना ‘वॉन्टेड’ असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध धारणी प्रथमश्रेणी न्यायालयात प्रलंबित दोन प्रकरणांत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला जामीन रद्दच्या अर्जावर अर्जावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या निकालामुळे पटेलांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
खारी प्रकरणात राजकुमार पटेल यांच्यावर गंभीर गुन्हे असताना अचलपूर सत्र न्यायालयाने अंतरिम जामिन दिला होता. मात्र, १२ जानेवारी रोजी त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत, तर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्यांच्या शोधात आहेत. दरम्यान, धारणी न्यायालयात प्रलंबित दोन प्रकरणांत पोलिसांनी जामीन खारीज करण्याचे निवेदन दिले होते. ते न्यायालयाने मान्य केले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. त्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. तूर्तास राजकुमार पटेल यांची अडचण कायम आहे. राजकुमार पटेलांचा राजकीय जनाधार कमकुवत व्हावा, यासाठी त्यांचे राजकीय विरोधक एकवटले असून, त्यांनी एकत्रित प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.