राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू
By Admin | Published: February 20, 2017 12:03 AM2017-02-20T00:03:54+5:302017-02-20T00:03:54+5:30
येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवटेकडीवर रविवारी सकाळी १० वाजता शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
श्रीमंत कोकाटे यांचे प्रतिपादन : शिवटेकडीवर शिवजयंतीचा जल्लोष
अमरावती : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवटेकडीवर रविवारी सकाळी १० वाजता शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्र्यावर दीड तास अभ्यासू मार्गदर्शन केले.
शिवचरित्रातील अनेक घटना सद्यस्थितीशी सांगड घालून ओघवत्या शैलीत मांडल्या. ते म्हणाले, शिवरायांनी स्वराज्यात महिलांची सुरक्षा प्राधान्याने केली. शिवरायांनी सामाजिक पुरोगामित्व जपण्याचा कसोशिने प्रयत्न केला. लढताना धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सन्मानजनक पुनर्वसन त्यांनी केले.
म्हणून घडले छत्रपती शिवाजी
अमरावती : ते कधीही अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या नादी लागले नाहीत. त्यांनी ही शिकवण त्यांच्या आईसाहेबांकडून घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ याच होत्या. त्यांच्या संस्कारातूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. क्युबा, व्हिएतनाम सारख्या देशांनी अमेरीकेविरूद्ध लढताना शिवरायांपासून प्रेरणा घेतल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणातून केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व पूजन करण्यात आले. याठिकाणी हिंदू विद्यापीठाचे विभागप्रमुख सतीश पावडे, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर, सांख्यिकी अधिकारी वर्षा भाकरे, गोविंद लाहोटे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सतीश पावडे, संजय बाहेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत मोहिते यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी रॅलीदेखील काढली. यावेळी त्यांनी शिवकालीन वेशभूषा साकारली होती. पंचवटी चौकातूनदेखील रॅली काढण्यात आली. (प्रतिनिधी)