राजापेठ उड्डाण पुलाचे पाचव्यांदा भूमिपूजन !
By admin | Published: December 27, 2015 12:38 AM2015-12-27T00:38:44+5:302015-12-27T00:38:44+5:30
केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट ...
अमरावती : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन होत आहे. आताही अमरावती महापालिकेची निवडणूक असल्याने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पाचव्यांदा भूमिपूजनाचा घाट रचला गेल्याचा आरोप कृती समितीचे मुन्ना राठोड आणि नितीन मोहोड यांनी केला आहे.
मुन्ना राठोड आणि मोहोड यांनी खा. आनंदराव अडसुळांवर श्रेय लाटण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप शनिवारी पत्रपरिषदेतून केला आहे. उड्डाण पुलाबाबत संपूर्ण माहिती महापालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाचे काम सुरू झाले असताना भूमिपूजन कशाचे? आणि निधी कुठाय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाला विरोध नाही. मात्र ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी या उड्डाण पुलाचे पाचवे भूमिपूजन होत असल्याने रखडलेल्या उड्डाण पुलाचे अनुभव पाहता राजापेठ उड्डाण पूल किती वेळात पूर्ण होईल, याची डेडलाईन गडकरींनी अमरावतीकरांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उड्डाण पुलाच्या कामासाठी जो १० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला. या निधीवर कर्ज घेतल्याने कर्ज परतफेड होईपर्यंत ती १० कोटींची रक्कम पालिकेला वापरता किंवा काढता येणार नसल्याचे नितीन मोहोड यांनी सांगितले. अमरावती महापालिकेने या उड्डाण पुलाची लांबी, रुंदी आणि एकंदरीतच खर्चाचा ताळेबंद जनतेसमोर मांडावा. (प्रतिनिधी)