कृषिमंत्र्यांनी काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 06:02 PM2017-11-27T18:02:38+5:302017-11-27T18:03:14+5:30
कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.
अमरावती : कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्र्वर येथे आयोजित सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या दुष्काळ परिषदेत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषेदतून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रहार केला. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात कापूस, सोयाबीनचे ६० ते ७० टक्के उत्पादन घटले. विदर्भात बोंडअळीचे आक्रमण हे कृषी खात्याचे अपयश आहे. शेतकºयांना वेळीच प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली नाही. बीेटी आणि बोगस बियाणांमुळे शेतक-यांवर ही परिस्थिती आल्याचा आरोप त्यांनी केला. जेमतेम पीक हाती आले असताना शेतक-यांना बाजारपेठेत हमीभाव नाही, तर दुसरीकडे सरकार शासकीय खरेदी केंद्र सुरू करीत नाही, असे विदारक चित्र आहे.
विषारी कीटकनाशक फवारणीने अनेक शेतक-यांचे बळी गेले, हे कृषी खात्याचे अपयश आहे. कृषी अधिकारी हे कृषी सेवा केंद्र, औषध कंपन्यांकडून हप्ते वसुलीत मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. बोंडअळीने नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी असेल. दलाल, व्यापा-यांच्या पाठीशी हे शासन असल्याने नाफेड, एफसीआय यावर पीएचडी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रपरिषदेला रविकांत तुपकर, अमित अढाऊ, प्रवीण मोहोड, शाम अडथळे, जि.प. सदस्य देवेंद्र भुयार, रवि पडोळे आदी उपस्थित होते.
गुजरातमध्ये शेतकरी नेत्यांसाठी प्रचार करू
केंद्र सरकार हे शेतक-यांविरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत शेतक-यांच्या हितासाठी निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारासाठी तेथे जाणार, असे खा. शेट्टी म्हणाले. सातबारा कोरा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीत घोळ; सरकार गंभीर नाही
राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी यात घोळ कायम आहे. कर्जमाफीची संख्या किती, हा आकडा जाहीर केला नाही. आॅनलाईन अर्जाच्या नावे आयटी कंपनीने गोंधळ करून ठेवला. त्यामुळे आता बँकांकडे पुन्हा कर्जमाफीची रक्कम वळती करण्यात आली. आयटी निविदा प्रक्रियेत अपहाराला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक जबाबदार आहे. अज्ञानामुळे कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. शेतकरी आंदोलनकर्त्यांना घेऊन येणारी रेल्वे तब्बल १८० किमी भरकटली. त्याबाबत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पाकिस्तानातून कांदा आयातीचे पाप सरकारचेच
पाकिस्तान हा शत्रू देश असल्याचे भासवून त्याच देशातून कांदा आयात करण्याचे पाप नरेंद्र मोदी सरकारने केल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. जेव्हा पाकिस्तानात ३०० रूपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते, तेव्हा भारतातून टोमॅटो मागविण्यास पाकिस्तानने नकार दिला, असे ते म्हणाले.