राज्यसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी : सर्वाधिक अपक्ष आमदार असणाऱ्या अमरावतीकडे ‘राज’कीय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 10:51 AM2022-06-04T10:51:16+5:302022-06-04T10:54:17+5:30

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे तर अमरावती जिल्ह्यात मात्र चारपैकी तीन अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे.

Rajya Sabha elections : 'Political' focus on Amravati whom has the most independent MLA | राज्यसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी : सर्वाधिक अपक्ष आमदार असणाऱ्या अमरावतीकडे ‘राज’कीय लक्ष!

राज्यसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी : सर्वाधिक अपक्ष आमदार असणाऱ्या अमरावतीकडे ‘राज’कीय लक्ष!

Next
ठळक मुद्देचार अपक्ष आमदार कुणासोबत

गजानन चोपडे

अमरावती : राज्यातील १६ अपक्ष आमदारांपैकी सर्वाधिक चार आमदार हे एकट्या अमरावती जिल्ह्यातून असल्याने राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मत कुणाच्या बाजूने राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बडनेरा, मोर्शी, मेळघाट आणि अचलपूर मतदारसंघांतून चार अपक्ष आमदारांना मतदारांनी निवडून दिल्याने राज्यसभा निवडणुकीत त्यांचे ‘राज’कीय महत्त्व वाढले आहे.

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे तर अमरावती जिल्ह्यात मात्र चारपैकी तीन अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे चित्र आहे.

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधणारे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नि:संदेह भाजपसोबत आहेत. याशिवाय आपण स्वत: इतर अपक्ष आमदारांच्या संपर्कात असून, त्यांना भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी आवाहन करत असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. काही आमदार शरीराने जरी ‘वर्षा’वर असले तरी ते राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत असल्याचाही त्यांचा दावा आहे. तिकडे आमदार बच्चू कडू स्वत: महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असल्याने ते व त्यांच्याच पक्षाचे अपक्ष आमदार राजकुमार पटेल हे महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी मिळाली म्हणून...

राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे त्यांच्या पक्षाला कधीच मतदान करणार नाहीत, असा सूर आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख हेच आपले नेते असल्याने त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण असल्याचे भुयार यांनी सांगितले. कुठल्याही प्रलोभनाला आपण बळी पडणार नसून, महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Rajya Sabha elections : 'Political' focus on Amravati whom has the most independent MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.