चिंचोली गवळी येथे सात घरांची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:19 AM2019-05-08T01:19:12+5:302019-05-08T01:19:41+5:30
तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अग्निप्रलय झाला.
गॅस सिलिंडर फुटले
मोर्शी : तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.
मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अग्निप्रलय झाला. या आगीत हिरावती अळसपुरे, मंदा नवड, योगीराज पाटील, मदन डांगे, महिपलसिंग बावरी, चंद्रकला पाटील, प्रमोद पाटील यांची घरे जळून खाक झाली. जोरदार हवेमुळे अग्निशमन दलाचे बंब पोहोचण्यापूर्वीच सारे काही खाक झाले.
गावात आग लागल्याची माहिती ग्रामस्थ प्रल्हाद पकडे यांनी पोलीस ठाणे व पालिका प्रशासनाने दिली. मोर्शी नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता ग्रामस्थ व अग्निशमन पथकाने व्यक्त केली. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या आगीत कूलर, पंखा, फ्रीज, आलमारी, कपडे, पाण्याच्या टाक्या, धान्य जळून खाक झाले. घराला लागलेले नाटा, छतासह लाकडी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
ग्रामस्थांची तत्परता
योगिराज पाटील यांचे गॅस सिलिंडर फुटल्याने आग भडकली. अशा स्थितीत ज्यांच्या घरी सिलिंडर होते, त्यांनी जिवाची पर्वा न करता ते बाहेर काढले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.