‘लोकमत’चे रक्षाबंधन : हजारो राख्या सीमेवरील जवानांसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2015 12:04 AM2015-08-31T00:04:59+5:302015-08-31T00:04:59+5:30
‘लोकमत’ सखी मंच व बालविकास मंचद्वारे आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून सखींनी राज्य राखीव पोलीस बलातील (एसआरपीएफ) जवानांना राख्या बांधून रक्षेचे वचन मागितले.
जवानांच्या मनगटावर ‘सखीं’नी बांधल्या राख्या
अमरावती : बहीण-भावाच्या प्रेमाचा आगळा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. ‘लोकमत’ सखी मंच व बालविकास मंचद्वारे आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून सखींनी राज्य राखीव पोलीस बलातील (एसआरपीएफ) जवानांना राख्या बांधून रक्षेचे वचन मागितले. त्यामुळे हा सण आगळा-वेगळा ठरला.
देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात जवान डोळ्यांत तेल घालून सदैव तत्पर असतात. त्यामुळेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’ सखी मंच-बालविकास मंच’द्वारे हा रक्षाबंंधनाचा उपक्रम रविवारी साजरा करण्यात आला. भावनिक बंध घट्ट लोकमत सखींनी त्यांना राख्या बांधल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसआरपीएफचे समादेशक जानकीराम डाखोरे होते. यावेळी सहायक समादेशक गोपालसिंह कोचर, पीएसआय कलाने, पी.आय. काकडे, विश्वभारती स्कूलचे प्राचार्य धर्माधिकारी, सुरेखा लुंगारे व सखी मंच विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम सखींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ‘लोकमत’ सखी मंचच्या विभाग प्रमुखांनी कमांडंटसह इतर जवानांच्या मनगटांवर राख्या बांधण्यास सुरूवात केली. जावांनांसोबत सखींनी यावेळी हितगूज साधले. सीमेवरील जवानांसाठी यावेळी ‘लोकमत’ च्या माध्यमातून संकलित केलेल्या जवळपास २००० राख्या पाठविण्यात आल्यात. राख्या संकलनासाठी तोमोय स्कूल, पी.आर. पोटे इंटरनॅशनल स्कूल, न्यू गोल्डन इंग्लिश स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, विश्वभारती पब्लिक स्कूल या शाळांनी भरघोस योगदान दिले. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राख्या तयार करून जवानांना पाठविल्यात.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती बडगुजर यांनी केले.
यावेळी जयंत कौलगीकर, शीतल चव्हाण आदींची उपस्थिती होती. ‘लोकमत’ सखी मंच-बालविकास मंच तसेच शहरातील विविध शाळांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे जवानांनी तोंडभरून कौतुक केले. घरापासून लांब राहून राखी साजरी करीत असल्याची कोणतीच उणीव या कार्यक्रमाने भासली नाही, असे मत जवानांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)