महिला, बालकांच्या मदतीला ‘ रक्षादीप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:18+5:302021-04-02T04:14:18+5:30
अमरावती : महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसावा आणि कायद्याबाबत जनजागृती व्हावी, म्हणून जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे ...
अमरावती : महिला, बालकांवरील लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना आळा बसावा आणि कायद्याबाबत जनजागृती व्हावी, म्हणून जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे रक्षादीप उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्याचाराचा वेळीच प्रतिकार कसा करावा, कायद्याने महिलांना दिलेले संरक्षण आदींबाबत माहितीपटाच्या माध्यमातून लोकशिक्षण सर्वदूर दिले जात आहे.
‘रक्षादीप’ उपक्रमात लोकशिक्षणासाठी दोन चित्ररथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात शाळेचा परिसर, आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गुन्हेकारक घटना व त्यातून बचावासाठीच्या कृती, कायद्याची माहिती आदी बाबी या माहितीपटातून कथारूपाने सादर केल्या आहेत. महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेत शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक हिंसा, बळजबरी, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, ॲसिड हल्ला या अत्याचाराविरोधात करावयाच्या कायदेशीर तरतुदीबाबत मार्गदर्शन उपाययोजना माहितीपटात दर्शविण्यात आली आहे.
महिला व बालकांवर कुठेही अत्याचार किंवा अपप्रकार घडत असल्यास त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी माहिती अमरावती ग्रामीण पोलीसांच्या हेल्पलाईन क्रमांक १०० किंवा ७५८८२१०००० या क्रमांकावर, दुरध्वनी क्रमांक २६६५०४१ किंवा ७५८८४१००००
या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित कळवावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी केले आहे.
------------------
वेबिनारच्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांची जनजागृती
कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे वेबिनारचे माध्यम वापरून जिल्ह्यातील विविध शाळांमधून १५ हजार विद्यार्थ्यांना जनजागृतीपर प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना विषयाच्या अनुषंगाने प्रश्नसूची देण्यात आली. या प्रश्नसूचीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची नोंद घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अनुबोधपट दाखविण्यात आला. त्यात हिंसेचे प्रकार, हिंसेचे बळी ठरत असलेल्या महिलांना कायद्याचे संरक्षण, प्रेमप्रकरणातून घडणारे गुन्हे, ॲसिड हल्ले, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचाराबाबत माहिती देऊन तीच प्रश्नसूची परत देण्यात आली. विद्यार्थ्याच्या आकलनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या उपक्रमाचा विद्यार्थ्याच्या पालकांचा, शिक्षकवर्ग, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
--------------------
प्रत्येक ठाणे, शाळांमध्येही तक्रार पेटी
तक्रार करण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये तक्रारपेटी उपलब्ध करून दिली आहे. अन्याय, अत्याचाराला तोंड देणाऱ्या, आपल्यासमोर गुन्हेगारी प्रवृत्तीची घटना घडत असल्यास तक्रारपेटीत तक्रार नोंदवावी, अशी माहिती यावेळी वेबिनारमध्ये सहभागी विद्यार्थ्याना देण्यात आली. भारतीय दंड संहिता व स्थानिक कायद्यांतर्गत नोंदीनुसार महिलांबाबत देशात झालेल्या गुन्ह्यांपैकी ९.२ टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडतात. त्यात आश्वासक बाब म्हणजे जास्तीत जास्त पिडीत महिला अन्यायाविरुध्द आवाज उठवत असून, न्यायासाठी कायदेशीर लढा देतात, अशीही नोंद आहे.
-----------------
कोट
_अन्यायाचा वेळीच प्रतिकार करण्यासाठी महिलांनी निर्भीडपणे पुढे आले पाहिजे. याबाबत जनजागृती व लोकशिक्षणासाठी रक्षादीप उपक्रम महत्वपूर्ण ठरेल_
- यशोमती ठाकूर, पालकमंत्री.
-------
काेट
ग्रामीण पोलीस दलाच्या रक्षादीप उपक्रमामुळे महिला, मुली , बालकांमध्ये जनजागृती होईल. अन्यायाविरुध्द पाऊल उचलण्याचे धाडस, त्याप्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल आणि अत्याचारांना आळा बसेल.
हरी बालाजी एन.,जिल्हा पोलीस अधीक्षक